For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लागण : बंडखोरीची अन् आजारांची!

06:30 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
लागण   बंडखोरीची अन् आजारांची
Advertisement

कर्नाटकात पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या 14 लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या या मतदारसंघात 247 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये 226 पुरुष, 21 महिलांचा समावेश आहे. कर्नाटकात 7 मे रोजी दुसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघांसाठी निवडणुका होणार आहेत. यासाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. सत्ताधारी काँग्रेस व भाजप-निजद युतीचे नेते पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या नावावरच भाजपची मदार आहे. तर नमोंची लाट रोखण्यासाठी काँग्रेसने पाच गॅरंटींवर भर दिला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी पंधरवडा शिल्लक आहे. तरी राजकीय पक्षातील रुसवेफुगवे, नेत्यांची नाराजी काही कमी होताना दिसत नाही.

Advertisement

खासकरून कर्नाटकातील सर्व 28 जागांवर विजय मिळविण्यासाठी व्यूहरचना करणाऱ्या भाजपला सर्वात जास्त असंतोषाचा फटका बसतो आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे चिरंजीव व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आदींसह अनेक मातब्बर नेत्यांनी प्रयत्न करूनही काही ठिकाणचे नाराजीनाट्या संपता संपेना. काही नेते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करू लागले आहेत. तर काही जण उघडपणे कारवाया न करता अंतर्गत पाठिंबा देताना दिसत आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कर्नाटकात येऊन गेले. कर्नाटकातील नेत्यांना त्यांनी सर्व हेवेदावे बाजूला ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी सगळ्याच नेत्यांनी कामाला लागण्याची सूचना केली आहे. तरीही अनेक जण अद्याप कामाला लागले नाहीत. तुमकूर, रायचूर, दावणगेरे, कारवार, बेळगावमध्ये परिस्थिती बिकट आहे.

केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांना पक्षाने यंदा धारवाडमधून उमेदवारी देऊ नये, अशी मागणी वीरशैव लिंगायत मठाधीशांनी केली होती. यासाठी पक्षाला मुदतही देण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीत आपल्या पक्षाचे उमेदवार बदलणार नाहीत, अशी भूमिका भाजपने जाहीर केल्यानंतर शिरहट्टी व बालेहोसूर येथील फकिर दिंगालेश्वर स्वामीजींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. लिंगायत मठाधीशांच्या या निर्णयाने भाजपचे संकट वाढले आहे. आमचा लढा भाजपविरुद्ध नाही तर प्रल्हाद जोशी यांच्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. पक्षाने लोकभावना लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी नाकारली असती तर आम्ही राजकारणात पडणार नव्हतो. मात्र, पक्षाला लोकांची कदर नाही. म्हणून आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे स्वामीजींनी सांगितले आहे. त्यांनी प्रत्यक्षात रिंगणात उतरू नये म्हणून भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न चालवले आहेत. मात्र, आपण माघार घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका स्वामीजींनी घेतली आहे.

Advertisement

याच मतदारसंघातून 2004 मध्ये माते महादेवी यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. आता दिंगालेश्वर स्वामीजींनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. उत्तर भारतात संन्याशी, धार्मिक नेते, मठाधीशांनी निवडणूक लढविणे नवे नाही. योगी आदित्यनाथ हे उत्तरप्रदेशमधून तर उमा भारती या मध्यप्रदेशमधून सक्रिय राजकारणात उतरल्या. दोघेही मुख्यमंत्रीही झाले. योगी आदित्यनाथ यांची देशभरात उत्तम प्रतिमा आहे. साध्वी निरंजन ज्योती, साध्वी प्रज्ञासिंग, स्वामी अग्निवेश, साक्षी महाराज व सोलापुरात डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजींनी निवडणूक लढविली. ते विजयीही झाले. आता दिंगालेश्वर स्वामीजी धारवाडमधून नशीब आजमावत आहेत. चित्रदुर्गमध्ये मादार चन्नय्यास्वामीजी भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढविणार, अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी नकार दिला. गेल्या अनेक निवडणुकांत धार्मिक नेत्यांना सक्रिय राजकारणात आणण्याचे प्रयत्न झाले आहेत. कर्नाटकात असे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.

धारवाडची परिस्थिती काय होणार? वीरशैव लिंगायत मठाधीशांचा विरोध मोडून केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी विजयी होणार की त्यांच्या विरोधात आघाडी उघडलेले सरस ठरणार? हे पहावे लागणार आहे. या मतदारसंघात भाजपने विनोद असुटी या नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे. आता दिंगालेश्वर स्वामीजींचा राजकीय प्रवेशाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर स्वामीजींनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत तर काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेऊन स्वामीजींना पाठिंबा द्यावा का? याचाही विचार हायकमांडच्या पातळीवर सुरू आहे. तसे झाले तर प्रल्हाद जोशी विरुद्ध दिंगालेश्वर स्वामीजी अशी लढत होणार आहे. मठाधीशांच्या आरोपांना प्रल्हाद जोशी यांनी सौम्यपणेच उत्तरे दिली आहेत. स्वामीजी हे काही बोलत आहेत, ते आपल्यासाठी आशीर्वादच आहे. जर आपल्या वागण्याबोलण्यातून चूक झाली असेल तर माफी मागण्याची आपली तयारी आहे, असे प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केल्यानंतरही निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर मठाधीश ठाम आहेत. त्यामुळे भाजपसाठी धारवाडची डोकेदुखी वाढली आहे. यामागे भाजपमधील अंतर्गत असंतुष्टांचे पाठबळ असून त्यांच्यामुळेच या घडामोडी आकार घेत आहेत.

कर्नाटकात दिवसेंदिवस तापमान वाढते आहे. विजापूर, बागलकोट, कोप्पळ, रायचूरमध्ये पारा 41 पर्यंत तर गुलबर्ग्यात 43 अंशापर्यंत पोहोचला आहे. वाढत्या उष्म्यामुळे रोगराईही वाढत आहे. राजधानी बेंगळूरमध्ये तर कॉलऱ्याची साथ सुरू झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात वास्तव्य करून असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांना कॉलरा झाला आहे. त्यामुळे सरकारला नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करावे लागले आहे. केवळ बेंगळूरच नव्हे तर संपूर्ण राज्यात खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. कारण वाढत्या उष्म्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विचित्र आजारांना सामोरे जावे लागत आहे. वैद्यकीय अहवालात सर्व काही ठीकठाक असले तरी त्यांचे आजार काही कमी नाहीत, अशी परिस्थिती अनेक जिल्ह्यात पहायला मिळते आहे. उलटी-जुलाबाचे रुग्णही वाढत आहेत. दूषित पाण्यामुळे आजारांची लागण वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. विहिरी, तलाव, नदी, नाले आटले आहेत. तळातील पाण्याच्या सेवनामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कॉमन मॅन त्रस्त झाला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत कॉमन मॅनचा विसरच पडला आहे.

Advertisement
Tags :

.