For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्राहकांना बसणार वीज दरवाढीचा शॉक

07:10 AM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
ग्राहकांना बसणार वीज दरवाढीचा शॉक
Advertisement

ऑक्टोबर-नोव्हेंबरसाठी प्रतियुनिट 40-50 पैसे वाढ शक्य : लवकरच अधिकृत आदेश

Advertisement

धक्का...

  • 1 नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता
  • सप्टेंबरमधील अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी तात्पुरती उपाययोजना
  • गृहज्योती’ योजनेच्या कक्षेत न येणाऱ्या ग्राहकांना लागू होणार

बेंगळूर : राज्यात सप्टेंबर महिन्यात निर्माण झालेल्या भीषण वीज संकटामुळे आलेला अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी, राज्य सरकार आणि ऊर्जा खाते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांसाठी वीज दरात प्रति युनिट 40 ते 50 पैसे वाढ करण्याच्या विचारात आहे. हे सुधारित दर 1 नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. संभाव्य वीज दरवाढ इंधन आणि वीज खरेदी खर्च समायोजन नियमावलीच्या अंतर्गत येते. कर्नाटक वीज नियामक आयोगाच्या अंतिम मंजुरीनंतर वीज दरवाढ लागू केली जाईल. ‘गृहज्योती’ योजनेच्या कक्षेत न येणारे ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहकांना त्यांच्या मासिक वीज बिलामध्ये हा अतिरिक्त दर भरावा लागेल.

Advertisement

सप्टेंबर महिन्यात नैर्त्रुत्य मान्सूनची कमतरता आणि कोरड्या हवामानामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी निर्माण झाली होती. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेची मागणी विक्रमी 20,000 मेगावॅटच्या वर गेली होती. राज्याकडे जलविद्युत, औष्णिक, सौर आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून 22,000 मेगावॅटपर्यंतची वीाि मागणी पूर्ण करण्याची क्षमता असली, तरी वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे पवन ऊर्जेच्या उत्पादनात मोठी घट झाली. सामान्यत: दररोज 2,500 ते 3,000 मेगावॅट मिळणारी पवन ऊर्जा कमी होऊन केवळ 200 ते 300 मेगावॅटवर आली होती. रात्रीच्या वेळी सौर ऊर्जा उपलब्ध नसते, त्यात पवन ऊर्जेचे उत्पादनही घटल्यामुळे विद्युत ग्रीडवरील ताण लक्षणीयरित्या वाढला होता.

वीज निर्मितीतील ही गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी आणि वारंवार  वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार टाळण्यासाठी, सरकारला खुल्या बाजारातून जादा दराने वीज खरेदी करावी लागली. साधरणत: वीज 6 रुपये प्रति युनिट दराने खरेदी केली जाते. खुल्या बाजारातील उच्च दराच्या काळात ती 7 ते 8 रुपयांपर्यंत पोहोचते. मात्र, सप्टेंबर महिन्यात दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्येही तीव्र वीज टंचाई निर्माण झाल्यामुळे वीज खरेदीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. काही राज्यांनी दिवसाच्या वेळीही 25 ते 30 रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी केली, असे ऊर्जा खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

काटकसरीने वीज वापरण्याचा ग्राहकांना सल्ला

रात्रीच्या वेळी वीज ग्रीडवरील ताण कमी करण्यासाठी आणि वीज वापराचे नियोजन करण्यासाठी, राज्यातील विविध वीज वितरण कंपन्यांनी (एस्कॉम) ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. वॉशिंग मशिन आणि जास्त क्षमतेचे वॉटर पंप यासारखी अधिक वीज वापरणारी उपकरणे दिवसाच्या वेळी जेव्हा सौर ऊर्जा उपलब्ध असते तेव्हा वापरावीत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे.

तात्पुरती अन् अल्पकालिन दरवाढ

व्यावसायिक आस्थापनांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य नसते. मात्र, घरगुती वीज वापरकर्त्या ग्राहकांनी स्वेच्छेने रात्रीच्या वेळेऐवजी दिवसा विजेचा वापर करण्याचे नियोजन केले, तर विद्युत ग्रीडवरील ताण कमी होऊ शकेल. कर्नाटकात यापूर्वीच तीन वर्षांची दररचना (टॅरिफ स्ट्रक्चर) लागू करण्यात आली असून, 2025 मधील दर सुधारणा 2028 पर्यंत कायम राहणार आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात आलेल्या अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी ‘फ्युएल अँड पॉवर परचेस कॉस्ट अॅडजस्टमेंट’ व्यवस्थेद्वारे लागू केलेली ही तात्पुरती आणि अल्पकालीन दरवाढ केवळ आगामी एका महिन्यासाठीच असेल, असे ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.