ग्राहक आयुक्त न्यायालय, कँटीनची समस्या त्वरित सोडवा
बार असोसिएशनची पालकमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : कर्नाटक राज्य ग्राहक आयुक्त न्यायालय बेळगावला मंजूर झाले. मात्र, जागेविना हे न्यायालय सुरू करणे अशक्य झाले आहे. या न्यायालयाला जागा उपलब्ध करावी, यासाठी बेळगाव बार असोसिएशन आणि वकिलांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना संबंधित न्यायालयाला तातडीने जागा उपलब्ध करण्याची सूचना केली आहे. तीन वर्षापूर्वी बेळगावला कर्नाटक राज्य ग्राहक आयुक्त न्यायालय मंजूर झाले आहे. या न्यायालयासाठी वकिलांनी आंदोलन केले. त्यानंतर सरकारकडून मंजुरी मिळाली. तरीदेखील जागेअभावी हे न्यायालय सुरू करणे अशक्य झाले आहे. तेव्हा या न्यायालयासाठी तातडीने जागा उपलब्ध करावी, असे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांनी पालकमंत्र्यांकडे केली. त्यावर तातडीने या न्यायालयाला जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. आमदार राजू सेठ हे देखील यावेळी उपस्थित होते.
कँटीनच्या कामाला तातडीने सुरुवात करा
न्यायालयामध्ये कँटीन उभारणीसाठी उच्च न्यायालयाच्या रजिस्टर जनरल यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र पाठवण्यात आले आहे. 13×21 मीटरमध्ये हे कँटीन बांधण्यात येणार आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात हे कँटीन होणार आहे. याचबरोबर जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये वकिलांसाठी आणखी एक चेंबर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 7 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र, अद्याप ही कामे सुरू करण्यात आली नाहीत. तेव्हा तातडीने ही दोन्ही कामे सुरू करावीत, अशी मागणीही वकिलांनी पालकमंत्र्यांकडे केली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व कामे तातडीने सुरू करा, अशी सूचना केली आहे. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. विजय पाटील, ॲड. शीतल रामशेट्टी, जनरल सेक्रेटरी ॲड. वाय. के. दिवटे, ज्येष्ठ वकील ॲड. आण्णासाहेब घोरपडे, ॲड. एन. आर. लातूर, ॲड. सांबरेकर, ॲड. जायाण्णाचे, ॲड. आर. पी. पाटील यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.