बांधकाम कामगारांना मिळणार ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना आदेश
मालवण | प्रतिनिधी
संघटनेच्या मागणीनुसार माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी बांधकाम कामगारांना ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र देण्याबाबत गटविकास अधिकारी यांना लेखी पत्र काढले.ग्रामसेवक यांना शासनाच्या वेळोवेळच्या आदेशांचे पालन करुन बांधकाम कामगारांना ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र देण्याचे कळविले आहे. याबाबत भारतीय मजदूर संघ जिल्हा अध्यक्ष सत्यविजय जाधव, बांधकाम कामगार महासंघ जिल्हा अध्यक्ष भगवान साटम व बांधकाम कामगार कल्याणकारी संघ जिल्हा अध्यक्ष बाबला नांदोसकर यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार भाजपा नेते निलेश राणे यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत.
भारतीय मजदूर संघाने माजी खासदार निलेश राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन बांधकाम कामगारांना शासन आदेशानुसार ग्रामसेवक ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र देत नाहीत यासाठी लक्ष वेधले होते. तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी संघ जिल्हा अध्यक्ष बाबला नांदोसकर व त्यांच्या पदाधिकारी यांनी १३ ऑगस्ट रोजी ओरोस येथे जनता दरबार येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे याप्रश्नी लक्ष वेधले होते. यास अनुसरून माजी खासदार निलेश राणे यांनी हा प्रश्न योग्य असल्याचे सांगत कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि शासन आदेशांचे पालन झाले पाहीजे अशी भुमिका मांडली. त्यानंतर पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी उपस्थित जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासन आदेशानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देऊन तशी तातडीने प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्याचे सूचीत केले होते. यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांनी १४ ऑगस्ट २०२४ च्या पत्रानुसार सर्व गटविकास अधिकारी यांना कळवून शासन आदेशानुसार ग्रामसेवक यांनी बांधकाम कामगारांना ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्याचे कळविले आहे.
या बाबत भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सत्यविजय जाधव, बांधकाम कामगार महासंघ जिल्हा अध्यक्ष भगवान साटम व बांधकाम कामगार कल्याणकारी संघ जिल्हा अध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार निलेशजी राणे यांचे कामगारांना न्याय मिळवून दिल्या बद्दल आभार मानले आहेत. तसेच लवकरच भेट घेऊन प्रत्यक्ष आभार व्यक्त करणार असल्याचे सांगितले.