अगसगे प्राथमिक कन्नड-मराठी शाळा नूतन इमारतीचे बांधकाम संथगतीने
केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्याकडून पाहणी-कंत्राटदाराला सूचना
वार्ताहर/अगसगे
अगसगे येथील प्राथमिक कन्नड व मराठी शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची कामे संथगतीने सुरू होती. याची दखल घेऊन आमदार व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी भेट देऊन कंत्राटदाराला काम तीव्र गतीने सुरू करण्याची सूचना केली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्या फंडामधून तीन मजली सुसज्ज इमारत बांधण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या इमारतीमध्ये कन्नड व मराठी या दोन्ही शाळा होणार असून यामध्ये स्वतंत्र असे सभा भवन, शौचालय, भोजनालय, क्रीडांगण होणार आहे.
शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली जुनी इमारत काढून या ठिकाणी सुसज्ज असे तीन मजली प्राथमिक कन्नड व मराठी शाळा बांधण्यात येणार आहे. चार महिन्यापूर्वी खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. या शाळेचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे व यासाठी सुमारे तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र कंत्राटदाराने काम संथगतीने सुरू केले आहे. सध्या विद्यार्थी मंदिरामध्ये बसून शिक्षण घेत आहेत. शाळेची इमारत त्वरित पूर्ण व्हावी यासाठी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच कंत्राटदाराला व अभियंत्याला उत्तम दर्जाचे साहित्य वापरावेत. तसेच शाळेची इमारत बांधकाम संथगतीने का सुरू आहे, असा जाब विचारण्यात आला.
यावेळी कंत्राटदाराने यापुढे काम गतीने सुरू करण्यात येईल. काही मजुरांचा तुटवडा आहे. मजूर देखील मागून घेतो व शाळेची कामे वेळेत पूर्ण करून देतो, असे सांगितले. यावेळी ग्रा.पं. अमृत मुद्देनावर, सदस्य अप्पयगौडा पाटील, गुंडू कुरेनावर व पीकेपीएस उपाध्यक्ष सिद्राय गडकरी, सदस्य गौडाप्पा पाटील, कलगौडा पाटील, अशोक रेडेकर, रामा कुरेन्नावर, अपया कोलकार, शंकर मेणसे आदी उपस्थित होते.