Ashok Saraf | केशवराव नाट्यगृहाचे बांधकाम रेंगाळू नये : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ
अशोक सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले हे प्रतिभावान कलाकार होते. त्यांच्या नावाने कलानगरी कोल्हापुरात नाट्यगृह असणे हे तर एक विशेषच म्हणावे लागेल. अशा या विशेष नाट्यगृहाला आग लागून ते भस्मसात झाले. सध्या हे नाट्यगृह उभारणीचे काम सुरू आहे. ते काम फार काळ रेंगाळून ठेवू नये असे मला वाटते, अशी भावना महाराष्ट्र भूषण, पद्मश्री व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने अशोक सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्काराने शनिवारी गौरवले. यानिमित्त देवल क्लबमध्ये आयोजित समारंभात ते बोलत होते.
संगीतसूर्य केशवराव मोसले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने समारंभाला सुरुवात केली. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते अशोक सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार देण्यात आला. नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष जितेंद्र देशपांडे यांनी मानपत्राचे वाचन केले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, अशोक सराफ यांची जन्मभूमी मुंबई असली तरी कर्मभूमी कोल्हापूर आहे, याचा आनंद वाटतो. आपल्या अभिनयातून लोकांवर राज्य करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. मराठी रसिक प्रेक्षक त्यांचा चित्रपटातील अभिनय, विनोद विसरु शकणार नाहीत. २०१९ साली कोल्हापूरमध्ये महापूर आला होता. त्याकडे गांभीर्याने पाहून सराफ यांनी ३ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री फंडाकडे दिली होती हे मी विसरलेलो नाही
नाट्यगृह गतवैभवाने दिमाखात उभे केले जाईल, असा शब्दही मुश्रीफ यांनी यावेळी दिला. उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रात अशोक सराफ यांनी अनन्यसाधारण कामगिरी बजावली आहे. संघर्षामुळेच त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मश्री हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले.
सराफ यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान अतुलनीय आहेच, शिवाय प्रेक्षकांना आपलसं करणारं आहे, असेही सामंत म्हणाले. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपल्यानंतर मुलाखतकार विघ्नेश जोशी यांनी अशोक सराफ व त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची मुलाखत घेतली. कोल्हापुरातील चित्रपटांच्या शूटींगमधील किस्से, आलेले अनुभव त्यांनी सांगितले.
लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीसह विविध संस्थांनी या समारंभाचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह गिरीश महाजन यांनी प्रास्ताविक केले. संचालक शुभदा हिरेमटी यांनी सूत्रसंचालन केले.
घरच्या लोकांनी माझा सन्मान केला : अशोक सराफ
कर्मभूमी कोल्हापुरात मला संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्काराने गौरवले याचा मला विशेष आनंद झाला आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत मी आपल्या विनोदी शैलीने लोकांना हसवले. त्याचीच पावती म्हणून महाराष्ट्र सरकारने मला महाराष्ट्र भूषण आणि केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. आज संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार मला मिळाला, हे माझ्यासाठी अद्वितीय आहे. हा पुरस्कार माझ्या घरातील लोकांनीच मला दिला आहे. कोल्हापुरात मी बराच काळ होतो. मला आजही अनेक ठिकाणे, गल्ल्या माहिती आहेत. कोल्हापूरची मला ओढ आहे. महिन्यात आठ दिवस तरी कोल्हापुरात येऊन रहावे, असे मला वाटते आहे, सराफ यांनी सांगितले.