पिरवाडीत क्रिकेट ग्राऊंडची निर्मिती
कोल्हापूर / संग्राम काटकर :
कोल्हापुरात लेदरबॉल क्रिकेट स्पर्धांसाठी अनेक मैदाने आहेत. पण प्रत्यक्ष सामन्यांचा सराव करण्यासाठीची मैदाने नाहीत. ही कमतरता भरून काढण्यासाठी माजी क्रिकेटपटू केदार केशव गयावळ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी क्रिकेटमधील आपला अनुभव सत्कारणी लावत पीरवाडी येथील भाऊराव पाटील शिक्षण संस्थेच्या मोकळ्या जागेत गतवर्षी क्रिकेटचे मैदान तयार केले आहे. या मैदानावर दहा लाख रुपये खर्चून उच्च दर्जाच्या 3 टर्फ विकेटसह हिरवळ फुलवली आहे. तसेच मैदानाच्या आऊट फिंल्डमध्ये बॉक्स नेट उभे कऊन त्यामध्ये फलंदाजी व गोलंदाजीचा सराव करण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील संघांना या मैदानात सराव सामने खेळता येणार आहेत.
लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापुरातील शास्त्रीनगर, राजाराम कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन, शिवाजी विद्यापीठ, शाहूपुरी जिमखाना येथे मैदाने आहेत. छत्रपती शिवाजी स्टेडियम हे जरी लेदरबॉल क्रिकेटसाठीच असले तरी या स्टेडियममधील खेळपट्टीची अक्षरश: वाट लागली आहे. स्टेडियममधील खेळपट्टी व आऊट फिल्ड स्पर्धा खेळवण्या लायक करा, अशी मागणी जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे खुद्द कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच करत आहे. परंतू त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या स्टेडियममध्ये स्पर्धा घेण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्यामुळे स्पर्धा आयोजक जिल्हा क्रिकेट असोसिएशन, फायटर्स स्पोर्टस् क्लब, शांद फाऊंडेशन, पॅकर्स क्रिकेट क्लब यांच्याकडून क्रिकेट स्पर्धेसाठी लायक शास्त्राrनगर, राजाराम कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन, शिवाजी विद्यापीठ, शाहूपुरी जिमखानामध्ये स्पर्धांचे आयोजन केले जाते. क्रिकेट हंगामात या मैदानांवर सतत स्पर्धा होत असल्याने विविध संघांमधील नव्या, जुन्या खेळाडूंना सामना खेळण्यास लागणारा अनुभव मिळण्यासाठी ग्राऊंड नाहीत. हे ओळखून केदार गयावळ यांनी आपल्या मयुर स्पोर्टस् अॅकॅडमीच्या माध्यमातून पीरवाडी येथील भाऊराव पाटील शिक्षण संस्थेच्या जागेत क्रिकेटचे मैदान बनवले आहे. गयावळ हे फायर्टस् स्पोर्टस् क्लबचे माजी खेळाडू आहेत. त्यांनी 2004 साली मयूर स्पोर्टस् अॅकॅडमीची स्थापन कऊन नवोदीत खेळाडूंना क्रिकेट स्पर्धा खेळण्याची संधी मिळवून दिली. तसेच जिल्हा व राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा खेळण्यालायक अनेक खेळाडू तयार केले. गयावळ यांनी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कोल्हापूर जिल्हा संघातून अनेक निमंत्रित क्रिकेट स्पर्धा खेळल्या आहेत.
सामना खेळण्यापूर्वी सामना खेळण्याचा सराव नसेल तर खेळाडूंना मॅच टेम्परामेंटप्रमाणे खेळणे कठिण जाते याची गयावळ यांना पूर्ण जाणिव आहे. या जाणिवेतून त्यांनी पिरवाडी येथे क्रिकेट मैदान बनवले आहे. त्यासाठी भाऊराव पाटील शिक्षण संस्था व मयूर स्पोर्टस् यांच्यात समझोता करार केला आहे. या करारानुसार क्रिकेट मैदान अनेक खटपटी कऊन गयावळ यांनी मैदान तयार केले. आऊट फिल्डमध्ये हिरवळही फुलवली आहे. हे मैदान आता भाडेतत्वावर मयूर स्पोर्टस्कडे पुढील पाच वर्षे असणार आहे. गेल्या दोन वर्षात मैदानावर स्पर्धाही आयोजित केल्या गेल्या आहेत. भविष्यातही शहर व परिरसरातील संघांना या मैदानात सराव व स्पर्धात्मक सामने खेळता यावेत, यासाठी उच्च दर्जाच्या 3 टर्फ विकेट बनवल्या आहेत. गरजेनुसार मैदानातील बाऊंड्री 60, 65 व 70 यार्डपर्यंत करता येईल, अशी व्यवस्था केली आहे. मैदानात बऱ्यापैकी हिरवळही फुलवली आहे. गवत नेहमी हिरवेगार रहावे, यासाठी पाण्याचीही सोय केलेली आहे. याशिवाय एकाचवेळी जास्तीत जास्त फलंदाज, गोलंदाजांना चांगल्या पद्धतीने सराव करता यावा, यासाठी मैदानातच मॅटींग, टर्फ व सिमेंट विकेटचे बॉक्स नेट उभा केले आहेत. या बॉक्स नेटमध्ये केला जाणारा सराव आणि मैदानात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमुळे गोलंदाज व फलंदाजांना मोठा अनुभव मिळत राहणार आहे. या अनुभवाचा खेळाडूंना मोठमोठ्या स्पर्धामधील सामने खेळताना मोठा उपयोग होणार आहे. मैदान उभारण्यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, ऋतुराज इंगळे यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे.

- ....म्हणून केली मॅच ग्राऊंडची निर्मिती
शहरातील बहुतांश संघातील क्रिकेटपटू नेट प्रॅक्टीस करत असतात. या सरावाचा प्रत्यक्ष सामना खेळताना उपयोग होईल, असे सांगता येत नाही. त्यासाठी क्रिकेटपटूंना सराव सामनेच खेळावे लागतात. टी-20, दोन दिवसीय आणि वन-डे सामन्यांचा सराव करायचा झाल्यास संघांना दिवसभर मैदाने मिळणे मुश्किल होते. हे लक्षात घेऊन पिरवाडी येथे मॅच ग्राऊंड तयार केले आहे. हे ग्राऊंड भाडेतत्वावर 12, 14 व 16 वर्षाखालील मुले व महिलांच्या संघांना मिळणार आहे. मैदान सामन्यांसाठी नेहमी सुसज्ज रहावे, यासाठी अक्षय पाटील व प्रतिक धोतरे हे ग्राऊंडस्मन म्हणून सतत कार्यरत असतात.
केदार गयावळ (संस्थापक : मयूर स्पोर्टस् अॅकॅडमी व संचालक, जिल्हा क्रिकेट असोसिएशन)