बांधकाम महागले
स्क्वेअर फूटाला 500 रूपयाची वाढ
बांधकामाचा दर स्क्वेअर फूटाला 2500
स्टील,सिमेंट ,मजूरीत वाढ
कोल्हापूर
सिमेंट, स्टील, कामगारांची वाढलेली मजूरी, इंधन वाढ आदी कारणामुळे बांधकाम व्यवसाय महाग होऊ लागला आहे. या सर्वांचा परिणाम नवीन बांधकामावर होऊ लागला आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने, कोल्हापूरात नवीन बांधकामाचा दर स्क्वेअर फूटाला 2500 रूपये , तर तयार फ्लॅटचा दर एरियानुसार 5000 पासून 7000 रूपये स्क्वेअर फूट झाला आहे.
सिमेंट, स्टील, कामगारांच्या मजूरीबरोबर कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने बांधकाम करणे आता सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर होऊ लागले s आहे. पूर्वी नोंदणी झालेल्या व बुकींग केलेल्या बांधकाम व्यावसायिकांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. तर नवीन बांधकामासाठी बांधकाम व्यावसायिकांना आता किमान स्क्वेअर फूटाला 500 रूपयांची वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सिमेंट 300 वरून 330
देशात कांही सिमेंट कंपन्यांची मक्तेदारी असल्याने, सिमेंट दरावर कोणाचेच नियंत्रण नाही. या कंपन्या सिमेंटचा जो दर काढतील त्या दरानेच सिमेंटचा दर बाजारात घ्यावा लागत आहे. गेल्या आठवडयात सिमेंटचा दर 290 ते 300 रूपये होता, तो आता 330 रूपये गोणी (50 किलो) अशी झाली आहे. गोणीमागे 20 ते 30 रूपयांनी सिमेंट महागले आहे.
स्टीलचा दर किलोला 55 वरून 61.50 रूपये
बांधकाम क्षेत्रात स्टील व सिमेंट हा महत्वाचा घटक आहे. गेल्या कांही दिवसापासून स्टीलच्या दरात वाढ झाली आहे. स्टीलचा दर किलोला 55 रूपये असा होता. तो आता 61.50 पैसे असा झाला आहे. यांमुळे बांधकामाचे एस्टीमेट पूर्णपणे विस्कळीत होऊन, बांधकाम खर्चामध्ये ही वाढ झाली आहे. स्टीलचा दर कमी होण्याची शक्यता नसल्याने, येत्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने स्टील व सिमेंट दरावर नियंत्रण ठेवण्याचा विचार होणे गरजेचे असल्याचे बांधकाम व्यावसायिकाकडून बोलले जात आहे.
विट, क्रॅश सॅन्ड ही महागले
बांधकामसाठी लागणाऱ्या लाल विटांचा तसेच व्रॅश सॅन्डचा दरही वाढला आहे. त्याचबरोबर वाहतूकीचा दर ही वाढला आहे. कारण पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने, वाहतूक करणे आता परवडत नाही. पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरीचा टप्पा पार केल्याने, वाहतूक दरही वाढला आहे. लाल विटा शेकडा दर 1200 ते 1250 रूपये असा होता. तो आता दर 1400 रूपये झाला आहे. तर क्रॅश सॅन्ड ब्रासला 3000 वरून 3500 रूपये झाली आहे.
मजूरीचा दर स्क्वेअर फूटाला 200 रूपये
महागाईचा फटका सर्वांना बसत आहे. याचा परिणाम कामगार क्षेत्रावरही बसला आहे. बांधकाम क्षेत्रामधील कामगार हे स्थानिक, कर्नाटक, राजस्थान येथील असून,त्यांच्या बांधकामाच्या दर्जावर त्यांची मजूरी ठरत असते. सध्या त्यांची मजूरी परवडत नसल्याने , त्यांनी सुध्दा मजूरीचा दर ही वाढवला आहे. 160 ते 170 रूपये स्क्वेअर फूट असलेली बांधकाम मजूरी आता 200 रूपये केली आहे.
स्क्वेअर फूटाला 500 रूपये दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही
कामगार टिकवणे बांधकाम व्यावसायिकांसमोर एक आव्हान आहे. स्व:ताचा खर्च करून,कामगारांना सांभाळावे लागले. सिमेंट, स्टीलचा वाढलेला दर, इंधन दरवाढ, कामगारांची वाढलेली मजूरी या सर्वाचा विचार केल्यास नवीन बांधकामाचा दर 500 रूपयांनी वाढवल्याशिवाय पर्याय नाही. सध्या एरियानुसार फ्लॅटचा दर 5000 ते 7000 रूपये स्क्वेअर फूट आहे. रेडिरेकनरंच्या दरात 10 टक्के वाढ होणार असल्याने, बांधकाम दरातही आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत.
- महेश यादव, क्रिडाई सदस्य कोल्हापूर
बांधकाम दरवाढ
वस्तू पूर्वीचा दर सद्याचा दर
सिमेंट 290 ते 300 330 गोणी
स्टिल 55 61.50 किलो
लाल विट 1200 ते 1250 1400 शेकडा
मजूरी 160 ते 170 200 स्क्वेअर फूट
क्रॅश सँड 3000 3500 ब्रास