देशाच्या बळकटीसाठीच केले घटनाबदल!
संविधानावरील चर्चेला पंतप्रधानांकडून रोख-ठोक प्रत्युत्तर : संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शनिवारी लोकसभेत दिवसभर झालेल्या संविधानावरील चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी वेगवेगळे मुद्दे मांडत एकमेकांवर हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपास्त्रानंतर दिवसअखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास पावणेदोन तास केलेल्या भाषणात काँग्रेसच्या सत्ताकाळातील अनेक मुद्यांचे दाखले दिले. तसेच भाजपप्रणित सरकारने राज्यघटनेत केलेले बदल हे देशाच्या बळकटीसाठी कसे फायदेशीर ठरत आहेत याचे स्पष्टीकरणही दिले.
काँग्रेसच्या डोक्यावरील पाप कधीच धुतले जाणार नाही!
संविधानावर बोलताना नरेंद्र मोदींचा घणाघात
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शनिवारी संविधानाच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त लोकसभेत संविधानावर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानावर रोखठोक भाष्य केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत केलेल्या कामाचाही उल्लेख केला. तसेच गेल्या 75 वर्षांतील महत्वाच्या काही घटनांचाही उल्लेख केला. 1975 मध्ये भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ‘काँग्रेसच्या डोक्यावरचे हे पाप कधीच धुतले जाणार नाही’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
भारतीय राज्यघटना स्वीकारून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. देश संविधानाची 25 वर्ष पूर्ण करत असताना देशात संविधान हटवण्याचा प्रयत्न झाला. भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. सर्व संविधानिक व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सर्वांचे हक्क हिरावून घेत देशाला एकप्रकारे जेलखाना बनवण्यात आले होते. माध्यमांच्या स्वातंत्र्यावरही गदा आणण्यात आली होती. मात्र, काँग्रेसच्या डोक्यावर लागलेले हे पाप कधीही पुसले जाऊ शकत नाही, असे मोदी म्हणाले. जगभरात कधीही लोकशाहीची चर्चा होत असतानाच ह्या आणीबाणीची आठवण झाल्यावाचून राहणार नाही, असे मोदी म्हणाले.
विविधतेत एकता टिकणे अत्यावश्यक
आपल्या देशात विविधतेत एकता असल्यामुळे अनेक धर्म, जातींचे लोक एकत्र नांदत आहेत. मात्र, आपल्या देशातील एकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता आपल्याला विविधतेमध्ये एकता आणावी लागेल. भारताची एकता मजबूत करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. कलम 370 ही देशाच्या एकात्मतेची भिंत बनली होती. मात्र, कलम 370 देखील रद्द करण्यात आले आहे. सीएएसारखे कायदे आणण्यामागे देशाची एकता टिकवणे हीच आपली प्राथमिकता आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. अशा कायद्यांच्या माध्यमातून घटनेत बदल केले जात आहेत. घटनेत होणारे हे बदल देश घडविण्यासाठी आणि बळकटी आणण्यासाठीच आपल्या सरकारकडून केला जात असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.
गांधी कुटुंबियांवर थेट अप्रत्यक्ष हल्लाबोल
काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानावर घाला घालण्याचे काम केले. संविधानावर घाला घालण्यात कोणताही कसूर काँग्रेसच्या एका कुटुंबाने सोडला नाही. कारण 75 वर्षांपैकी एका कुटुंबाने अनेक वर्ष राज्य केले. मात्र, देशात काय झालं हे जाणून घेण्याचा अधिकार आपल्या देशातील नागरिकांना आहे’, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
एकलव्याचे उदाहरण देत राहुल गांधींचा हल्लाबोल
तरुण, शेतकऱ्यांवरील अन्यायाचा वाचला पाढा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानावर बोलताना केंद्र सरकारवर विविध मुद्यांवरून जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांचे सुमारे 25 मिनिटे भाषण झाले. त्यांनी एकलव्य-द्रोणाचार्यांचा संदर्भ देत सरकारी अन्यायाचा पाढा वाचला. शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजना, पेपरफुटीसह हाथरस घटनेच्या मुद्यांवरून सरकारवर हल्लाबोल करत सावरकरांनी संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचे स्थान दिल्याचे विधान राहुल गांधींनी केले. ज्याप्रकारे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला होता अगदी त्याप्रकारे देशातील युवकांचा अंगठा, शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचे काम हे सरकार करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
भारतीय संविधान आमचा विचार आहे. मात्र, ‘आरएसएस’ने नेहमी मनस्मृतीची तळी उचलून धरली. आज देशात जे लोक इमानदारीने काम करतात, त्यांचा अंगठा कापण्याचे काम सरकार करते. देशातील गोरगरिबांवर सरकारकडून अन्याय सुरू आहे. आज देशातील तरुण सकाळी 4 वाजता उठून वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करतात. हजारो तरुण दररोज सकाळी उठून ग्राऊंडची तयारी करून लष्करात भरती होण्याचे स्वप्न पाहतात. पण केंद्र सरकारने अग्निवीर योजना लागू करून त्या तरुणांचा अंगठा कापण्याचे काम केले. देशात अनेक ठिकाणी पेपरफुटीच्या घटना घडल्या. तब्बल 70 वेळा पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या, तेव्हा देखील सरकारने देशातील तरुणांची बोटे कपण्याचे काम केले, अशा शब्दांत राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरले. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची स्थितीही तशीच आहे. आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून त्यांना राजधानीच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. ते आपल्या शेती पिकाला योग्य दर मागत असताना हे सरकार अदाणी आणि अंबानींचा फायदा करण्याचे काम करते, अशी टीका राहुल गांधींनी केली.
अन्य नेत्यांनीही मांडल्या भूमिका
लोकसभेत शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी संविधानावर चर्चा करण्यात आली. कामकाजाची सुरुवात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास राहुल गांधी यांच्या टीकेनंतर भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी जोरदार पलटवार केला. राहुल यांच्या वक्तव्यावर युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. ‘तुम्ही अंगठा कापण्याचे बोलत आहात. पण तुमच्या सरकारमध्ये शीखांचे गळे चिरले गेले, तुम्ही देशाची माफी मागावी’ असे थेट आव्हानच राहुल गांधी यांना दिले. काही लोक संविधान हातात घेऊन फिरतात, पण त्यात किती पाने आहेत हेही त्यांना माहीत नाही. तुम्ही ते कधीच वाचले नाही, असा आरोपही त्यांनी केला. रविशंकर यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेत आणीबाणी लादणारे लोकशाही मूल्यांबद्दल बोलत असल्याबद्दल विचारणा केली.
सरकारला वक्फ मालमत्ता बळकवायचीय: ओवैसी
एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संविधानावरील चर्चेत सहभाग घेत सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी सोडली नाही. घटनेच्या अनुच्छेद 26 मध्ये धार्मिक आणि धर्मादाय हेतूंसाठी धार्मिक पंथ, संस्था स्थापन करण्याचा आणि राखण्याचा अधिकार दिला आहे. वक्फचा संविधानाशी काहीही संबंध नाही, असे पंतप्रधान म्हणतात. पंतप्रधानांना कलम 26 कोण शिकवत आहे? अशी विचारणा करत वक्फचे अधिकार संपवणे आणि मालमत्ता बळकावणे हे सरकारचे लक्ष्य असल्याचा आरोप त्यांनी केला.