सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संविधान रॅलीचे आयोजन; नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. जनसमुदायांमध्ये संविधानात समाविष्ट असणारी हक्क आणि कर्तव्य यांची जनजागृती करून संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता. तसेच संविधानाबाबत जनमाणसात जाणीव-जागृती व्हावी याकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांच्यावतीने ऐतिहासिक बिंदू चौकात पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी राहुल रेखावार तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सकाळी 8.30 वाजता सुरु होणाऱ्या या संविधान यात्रेला बिंदू चौक येथे संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गगांराम कांबळे यांची समाधी असे मार्गक्रमण करुन पुढे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय चौकातून- दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन समारोप करण्यात येणार आहे. यासंबंधीची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली आहे.
या संविधान रॅली मध्ये जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, एन. सी. सी. , एन.एस.एस, स्काऊट गाईड, विद्यार्थी तसेच सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व निवासी शाळा, आश्रम शाळामधील विद्यार्थी विद्यार्थीनी पारंपारिक वेशभुषा परिधान करुन सदर संविधान रॅली मध्ये सहभागी होणार असून रॅलीमधील विदयार्थ्यांकडे शासन निर्णयात नमुद केल्यानुसार संविधानिक मुल्ये, संविधानाची कलमे, लोकशाहीची तत्वे, घोषवाक्ये, इत्यादी फलक सोबत आणण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. ज्या शाळांमध्ये मैदानी खेळ संघ, लेझीम पथक, झांज पथक, ढोल- ताशे उपलब्ध आहेत अशा महाविद्यालयांनी सदर रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्हयामध्ये विविध खेळांसाठी जसे कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, खोखो या मैदानी खेळांच्या संघटनांनी देखील या रॅलीमध्ये सहभागी व्हावे. तसेच जिल्ह्यातील व शहरातील विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे, बचत गट व नागरीकांनी 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनानिमीत्तच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावे असे अवाहन सचिन साळे यांनी केलं.