For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दरवर्षी 25 जून रोजी ‘संविधान हत्या दिन’

06:55 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
दरवर्षी 25 जून रोजी ‘संविधान हत्या दिन’
Advertisement

केंद्र सरकारकडून घोषणा : याच दिवशी 1975 मध्ये लागू केली आणीबाणी

Advertisement

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

यापुढे दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या दिवशी 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या सर्व घटनात्मक अधिकारांचा भंग झाला होता. आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. त्यामुळे हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर घटनेची पायमल्ली केल्याचा आरोप केला होता. हा पक्ष पुन्हा निवडून आला तर घटनेची तो हत्या करणार आहे. या पक्षाची 400 पारची घोषणा ही घटना नष्ट करण्यासाठीच आहे. याचसाठी या पक्षाला इतके मोठे बहुमत हवे आहे, असा प्रचार काँग्रेसकडून करण्यात आला होता.

विरोधकांचा छळ

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात दोन वर्षे आणीबाणी लागू ठेवली होती. या काळात सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना मिसा या कायद्याअंतर्गत अटक करुन कारागृहात डांबण्यात आले होते. देशभरात विरोधी पक्षांच्या असंख्य कार्यकर्त्यांचेही दमन सरकारने केले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लोकांचा मूलभूत अधिकार काढून घेण्यात आला होता. अनेक नेत्यांवर कारागृहात अत्याचारही करण्यात आले होते. दोन वर्षांनी आणीबाणी उठवून लोकसभेची निवडणूक घोषित केली होती. 1977 मध्ये झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला होता. स्वत: इंदिरा गांधी त्यांचा पुत्र संजयसह पराभूत झाल्या होत्या.

अमित शहा यांचा संदेश

25 जून 1975 या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या हुकूमशाही वृत्तीचे दर्शन घडविले होते. त्यांनी त्यांच्या या कृतीने घटनेची हत्या केली होती. ज्या पक्षाचा हा इतिहास आहे, तो काँग्रेस पक्ष आज आम्हाला लोकशाहीचे धडे देण्याचे औद्धत्य दाखवित आहे. पण या देशातील लोक सूज्ञ असून ते काँग्रेसचा इतिहास विसरलेले नाहीत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून विरोधी पक्षांवर केली आहे.

परिपत्रकात नोंद

25 जून हा संविधान हत्या दिन म्हणून पाळण्याच्या घोषणेची नोंद केंद्र सरकारच्या परिपत्रकात (गॅझेट) करण्यात आली आहे. ही माहितीही अमित शहा यांनी दिली आहे. प्रत्येक वर्षी 25 जून हा दिवस आणीबाणीच्या काळात झालेल्या अत्याचारांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची आणि त्या काळात सरकारशी संघर्ष केलेल्यांनी सहन केलेल्या कष्टांची आठवण म्हणून पाळण्यात येणार आहे. कोणत्याही संकटांशी दोन हात करुन यश मिळविण्याची क्षमता भारतीय जनतेत आहे, हा संदेश या निमित्ताने जगाला दिला जाणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

का लागू केली आणीबाणी...

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द ठरविण्याचा निर्णय त्या काळात दिला होता. इंदिरा गांधी यांनी निवडणूक काळात स्वत:चा प्रचार करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्याच आरोपात त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यामुळे त्यांना सत्ता गमवावी लागणार होती. ते टाळण्यासाठी त्यांनी आणीबाणी लागू केली होती, असे राजकीय तज्ञांचे मत आहे. देशात असाधारण परिस्थितीमुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले असेल तर आणीबाणी लागू करुन लोकांचे घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना असतो.

Advertisement
Tags :

.