For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यघटना संपुष्टात, जुलानी अध्यक्ष

07:00 AM Jan 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्यघटना संपुष्टात  जुलानी अध्यक्ष
Advertisement

सीरियाची संसद केली विसर्जित : देशावर पूर्ण नियंत्रण मिळणार : मागील महिन्यात असाद यांनी केले होते पलायन

Advertisement

वृत्तसंस्था/दमास्कस

सीरियातील बंडखोर गट तहरीर अल शामचा (एचटीएस) नेता अबू मोहम्मद अल जुलानीने दमास्कस येथे राज्यघटना संपुष्टात आणत स्वत:ला अध्यक्ष घोषित केले आहे. कमांडर हसन अब्देलघानीने जोपर्यंत देशात पूर्णपणे स्थिरता येत नाही, तोवर जुलानी अध्यक्षपदावर राहणार असल्याचे म्हटले आहे. सीरियातील संसद विसर्जित करण्यात आली आहे. नवी राज्यघटना लागू होईपर्यंत अध्यक्ष एक अस्थायी कार्यकारी परिषदेची स्थापना करतील, असे अब्देलघनीने सांगितले, परंतु याकरता कुठलीही कालमर्यादा सांगणे टाळले आहे.

Advertisement

माजी अध्यक्ष बशर अल-असाद यांच्या बाथ पार्टीशी निगडित सर्व संघटना आणि संस्थांना भंग करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या सर्व मालमत्तांवर सीरियाच्या सरकारचे नियंत्रण असेल, असे अब्देलघानीने सांगितले. मागील महिन्यात एचटीएसने सीरियात सत्तापालट घडवून आणत राजधानी दमास्कसवर नियंत्रण मिळविले होते. याचरोबर असद घराण्याची 54 वर्षांची राजवट संपुष्टात आली होती. तत्कालीन अध्यक्ष बशर अल असद यांनी पलायन करत मॉस्कोमध्ये आश्रय घेतला आहे.

वैद्यकीय शिक्षण सोडत दहशतवादाचा मार्ग

जुलानीला अहमद अल-शरा या नावानेही ओळखले जाते. त्याने 2000 साली वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, एका उदारमतवादी इस्लामयुक्त वातावरणात पालनपोषण झालेला जुलानी महाविद्यालयात कट्टर धार्मिक विचारसरणी असलेल्या लोकांशी जोडला गेला. 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर आक्रमण केल्यावर जुलानीने वैद्यकीय शिक्षण सोडून देत युद्ध लढण्यासाठी धाव घेतली होती. इराक येथे पोहोचल्यावर जुलानी हा अल-कायदाच्या संपर्कात आला. जून 2006 मध्ये अमेरिकेच्या सैन्याने त्याला पकडून तुरुंगात पाठविले होते. तुरुंगात असताना जुलानी हा बगदादीशी संबंधित लोकांच्या संपर्कात आला. 2011 मध्ये तुरुंगातून मुक्त झाल्यावर त्याने सीरियात अनेक हल्ले घडवून आणले. 2012 मध्ये त्याने अल-कायदाची सीरियातील शाखा जबात अल-नुस्त्रची स्थापना केली होती.

2017 मध्ये तहरीर अल-शामची निर्मिती

2017 मध्ये जुलानीने एक व्हिडिओ जारी करत हयात तहरीर अल-शामच्या स्थापनेची घोषणा केली. माझ्या संघटनेचा कुठलाही बाहेरील देश किंवा पार्टीशी कुठलाही संबंध नाही. माझा एकमात्र उद्देश सीरियाला असाद सरकारच्या तावडीतून मुक्त करणे असल्याचे त्याने म्हटले होते. 2018 मध्ये अमेरिकेने एचटीएसला दहशतवादी संघटना घोषित पेले आणि अल-जुलानीवर 10 दशलक्ष डॉलर्सचे इनामही घोषित केले होते. परंतु सीरियातील सत्तापालटानंतर अमेरिकेने हे इनाम हटविले होते.

सत्तापालट कसा घडवून आणला?

2016 मध्ये सीरियातील गृहयुद्ध शमल्यावर जुलानीने स्वत:च्या संघटनेला मजबूत करण्यास सुरुवात केली. चीनच्या उईगर मुस्लिमांपासून अरब अन् मध्य आशियातील लोकांच्या मदतीने त्याने स्वत:ची फौज तयार केली.  2022 मध्ये युक्रेनमधील युद्धात रशिया गुंतून पडला. यामुळे रशियाने स्वत:च्या सैनिकांना सीरियातून परत बोलाविले. मग 2023 मध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू झाला. यामुळे इराण आणि हिजबुल्लाह यांना असाद सरकारला मदत करणे अवघड ठरले. हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाह देखील कमकुवत झाली. याचाच लाभ घेत जुलानीने सीरियाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि 11 दिवसांत सीरियावर नियंत्रण मिळविले.

Advertisement
Tags :

.