For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठकसेन कॉन्स्टेबल पूजा गावस निलंबीत

12:59 PM Feb 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
ठकसेन कॉन्स्टेबल पूजा गावस निलंबीत
Advertisement

पोलिसस्थानकाला ठकवल्याचे प्रकरण : वृत्तपत्रांनी वाचा फोडल्याने भरले पैसे,प्रकरण मिटविण्याचे कारस्थान फसले

Advertisement

डिचोली : डिचोली पोलिसस्थानकातील पोलिसांकडून वाहतूक नियम भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून गोळा करण्यात येणारे लाखो रूपये परस्परपणे गायब करणाऱ्या पूजा गावस या महिला कॉन्स्टेबलच्या निलंबनाचा आदेश पोलिस खात्याकडून जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदर महिला कॉन्स्टेबलने कालच बुध. दि. 5 फेब्रु. रोजी गायब झालेले 14 लाख रूपये पोलिस खात्यात भरल्याची माहिती मिळाली आहे.‘कुंपणानेच शेत खाल्ले’ असाच हा प्रकार आहे. हे संपूर्ण प्रकरण करणारी एक महिला कॉन्स्टेबलच असल्याने डिचोली पोलिसस्थानकाने तसेच पोलिस खात्यानेही हे प्रकरण आपल्या पध्दतीने गुप्त ठेवले होते. पूजा गावस या महिला कॉन्स्टेबलने आपण कमी भरलेली रक्कम खात्यात भरण्याची हमी दिली होती. मात्र सदर रक्कम भरण्यात तिने मोठा विलंब केला. त्यामुळे हे प्रकरण बाहेर फुटलेच. व प्रसारमाध्यमांकडेही पोहोचले.

हे प्रकरण या महिला कॉन्स्टेबलने एकहाती केले असले तरी यात अन्य कोणाचाही हात आहे का? याची चौकशी सुरू होती. खात्याकडूनही हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले असून चोकशी सुरू करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार गेल्या डिसेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 या दरम्यान हा सर्व प्रकार घडला होता. डिचोली पोलिसस्थानकातील पोलिसांनी केलेल्या दंडात्मक कारावाईतून मिळालेली रक्कम ड्युटीवरील पोलिसस्थानकातील सदर महिला कॉन्स्टेबलकडे येत होती. ते पैसे पोलिस खात्याच्या बँक खात्यामध्ये भरण्याची जबाबदारी त्या महिला कॉन्स्टेबलची होती. मात्र सदर महिला कॉन्स्टेबलने चलनाच्या रक्कमेतील अर्धे अधिक पैसे बँक खात्यात जमा केलेच नसल्याचे निदर्शनास आले होते. एकूण चलनातून 25 लाखांपेक्षा जास्त पैसे दखविण्यात येत होते, पण  पोलीस खात्याच्या बँक खात्यामध्ये निम्म्याहून कमी पैसे जमा झाल्याचे निदर्शनास आले.

Advertisement

पूजा, प्रियानंतर आता पुन्हा ‘पूजा’ ठकसेन

गेल्या काही दिवसांपूर्वी डिचोली पोलिसस्थानक हे अशाच प्रकारे पैशांच्या गैरव्यवहारामुळे गाजले होते. त्याला कारण होते ते ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील पूजा नाईक, कोकण रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने लोकांना ठकवलेली प्रिया यादव. या दोन्ही पूजा व प्रिया यांच्यामुळे डिचोली पोलिसस्थानक बरेच गाजले होते. त्यानंतर आता पोलिस स्थानकातीलच पैशांच्या गैरव्यवहारामुळे खळबळ माजविलेल्या कॉन्स्टेबल पूजा गावस हिच्यामुळे पुन्हा डिचोली पोलिसस्थानक गाजले आहे.

Advertisement
Tags :

.