For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाबोळीतील नागरी विमानसेवा बंद करण्याचे कारस्थान सुरुच

04:27 PM Feb 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
दाबोळीतील नागरी विमानसेवा बंद करण्याचे कारस्थान सुरुच
Advertisement

खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा दावा

Advertisement

पणजी : सुरक्षेचे कारण दाखवून दाबोळी विमानतळ नागरी हवाई वाहतुकीस बंद करण्याचा डाव असून तशी फाईल संरक्षण मंत्रालयाने तयार केली होती. त्याबाबत त्याच मंत्रालयाकडे विचारणा केल्यावर ती फाईल स्थगित ठेवण्यात आली असून तो विमानतळ नौदलासाठी सुरू ठेवून नागरी विमानसेवेसाठी बंद करण्याचे कारस्थान चालूच असल्याचा दावा दक्षिण गोवा खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला आहे. पणजीत काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत फर्नांडिस यांनी भाजप सरकार आणि मंत्री, आमदारांच्या दाबोळी बंद करणार नाही या विधानाची खिल्ली उडवली. दाबोळी चालूच राहाणार हे त्यांचे म्हणणे नौदलापुरतेच मर्यादित आहे कारण तो नौदलासाठी कधीच बंद होणार नाही परंतु नागरी विमान वाहतुकीसाठी तो बंद होणार या विधानाशी आपण ठाम आहे. तशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गोव्यातील भाजपचे सरकार, मंत्री, आमदार दाबोळीबाबत थापा मारुन जनतेची दिशाभूल करीत असल्याचा पलटवार फर्नांडिस यांनी केला आहे.

जीएमआरला 266 कोटींचा तोटा

Advertisement

गोव्यातील मंत्र्यांना दाबोळीसाठी संरक्षणमंत्र्यांकडे जाण्याची गरज का भासली? असा प्रतिसवाल करुन फर्नांडिस म्हणाले की, ते मंत्री हवाई वाहतूक मंत्र्यांकडे का गेले नाहीत? याचे उत्तर त्यांनी द्यावे. मोपा विमानतळ जीएमआर कंपनी चालवत असून मागील तीन वर्षापासून त्या कंपनीस रु. 266 कोटींचा तोटा झाला आहे. तीच कंपनी हैदराबाद येथील राजीव गांधी विमानतळ चालवते पण जवळपास दुसरा विमानतळ नको यासाठी जवळ असलेला दुसरा विमानतळ बंद करण्यात आला, अशी माहिती फर्नांडिस यांनी दिली.

दाबोळी बंद करण्यासाठीच उड्डाणपुलाचे कारस्थान

जीएमआर कंपनीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी दाबोळी विमानतळ नागरी वाहतुकीसाठी बंद करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचे ते म्हणाले. दाबोळी विमानतळाजवळ उड्डाणपूल उभारण्यात आला परंतु त्यासाठी नौदलाचा परवाना घेण्यात आला नाही. कारण दाबोळी बंद करण्यासाठीच उड्डाणपूलाचे कारस्थान रचले असा आरोप फर्नांडिस यांनी केला.

निवडणुकीसाठी भाजपने शांत राहण्याचे ठरवले

ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षेचे कारण देऊन दाबोळी विमानतळ बंद करण्याची फाईल तयार होऊन ती मंजूर झाली. त्याची विचारणा आपण केली तेव्हा ती फाईल स्थगित करण्यात आली. आता पुढे 2027 मध्ये गोव्यात विधानसभा निवडणूक असल्याने त्यावेळी या विषयाचा गवगवा होऊन भाजपला धक्का बसणार म्हणून सध्या गप्प राहाण्याचे भाजपने ठरवल्याचे फर्नांडिस यांनी नमूद केले. हे जरी असले तरी दाबोळी बंद करण्याचे कारस्थान थांबलेले नाही आणि ते चालूच असल्याचा दावा फर्नांडिस यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.