For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वेला घातपात करण्याचा कट उघडकीस

06:55 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेला घातपात करण्याचा कट उघडकीस
Advertisement

कालिंदी एक्स्प्रेसमधील प्रवासी सुरक्षित : उत्तर प्रदेशमध्ये कानपूर शहरानजीक घटना

Advertisement

वृत्तसंस्था / वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील प्रयागराजपासून हरियाणातील भिवानी येथे जात असलेली कालिंदी एक्स्प्रेस उडविण्याचा कट चालकाच्या प्रसंगावधानामुळे उधळला गेला आहे. या गाडीच्या मार्गावर कानपूर शहराच्या नजीक शिवराजपूर येथे गॅस सिलिंडर आणि अन्य काही संशयास्पद वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. तथापि, चालकाच्या दृष्टीस त्या पडल्याने त्याने तातडीने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. गाडी गॅस सिलिंडरला धडकली. तथापि तोपर्यंत तिचा वेग बराच कमी झाला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही हानी झाली नाही.

Advertisement

रेल्वेने आणि उत्तर प्रदेश प्रशासनाने या घटनेच्या त्वरित चौकशीचा आदेश दिला आहे. रेल्वे पोलिसांनी रेल्वेमार्गावर ठेवण्यात आलेला सिलिंडर आणि इतर वस्तू ताब्यात घेतल्या असून त्यांची तपासणी होत आहे. सिलिंडर कोणी रेल्वेमार्गावर ठेवला हे शोधण्याचा प्रयत्न केला जात असून 23 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सिलिंडरजवळ पेट्रोलने भरलेली एक बाटली आणि काडीपेट्या आढळल्या आहेत. या सर्व वस्तू ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

पोलीस आणि एटीएसकडून चौकशी

रेल्वेच्या चालकाने या घटनेची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर त्वरित पोलीस आणि दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी पोहचले. पथकाने सिलिंडर आणि इतर वस्तू जप्त केल्या. रेल्वे या स्थानी साधारणत: 20 मिनिटे थांबली होती. नंतर ती पुढे नेण्यात आली आणि बिल्होर स्थानकावर पुढच्या तपासणीसाठी थांबविण्यात आली. या प्रकरणी एफआयआर नोंद करण्यात आला असून 2 जणांची कसून चौकशी केली जात आहे. हा दहशतवादाचा प्रकार असल्याची शक्यता नाकारण्यात आलेली नसून पोलीस आणि दहशतवादविरोधी पथक पुढील तपास करीत आहे.

महिनाभरातील दुसरा प्रकार

रेल्वेमार्गावर ठेवण्यात आलेल्या वस्तूवर गाडी धडकण्याचा हा एका महिन्यातील दुसरा प्रकार आहे. गेल्या महिन्यात वाराणसीहून साबरमतीला जाणाऱ्या एक्स्पे्रसचे इंजिन रेल्वेमार्गावर ठेवण्यात आलेल्या जड वस्तूला धडकले होते. त्यामुळे गाडीचे 22 डबे कानपूरनजीकच रेल्वेमार्गावरुन घसरले होते. त्यानंतर याच भागात घडलेला हा दुसरा प्रसंग आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

पाच पथके स्थापन

रेल्वेमार्गावर सिलिंडर आणि इतर धोकादायक वस्तू कोणी ठेवल्या, हे शोधण्यासाठी कानपूर पोलिसांनी पाच शोधपथके स्थापन केली आहेत. त्यांच्यावर गुन्हेगारांना शोधण्याचे उत्तरदायित्व देण्यात आले आहे. हा दहशतवादाचा प्रकार असू शकतो हे गृहित धरुन तपास केला जात आहे. लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्यात येईल. रेल्वेमार्गानजीक असणाऱ्या सीसीटीव्हींचेही साहाय्य होऊ शकेल, अशी माहिती कानपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त हरिष चंदर यांनी दिली.

सुदैवाने सिलिंडर फुटला नाही

रेल्वेच्या इंजिनाची सौम्य धडक बसल्याने सिलिंडर फुटला नाही. त्याचा स्फोट झाला असता, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सिलिंडरजवळ पेट्रोलने भरलेली बाटली सापडल्याने स्फोटातून आग लागावी अशी गुन्हेगारांची योजना असल्याचे स्पष्ट दिसून येते. तथापि, सुदैवाने असे कोणतेही प्रकार घडले नाहीत.

Advertisement
Tags :

.