बांगलादेशात तारिक सरकार उलथवण्याचा कट
10 हजार रायफल्स पोहोचल्याचा दावा : जमात-ए-इस्लामीवर आरोप : अजित डोवाल यांच्या ढाका दौऱ्यामुळे चर्चेला उधाण
बांगलादेशात पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी सरकार उलथवण्याचा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे. या कटाचा खुलासा बांगलादेश तसेच भारताच्या गुप्तचर यंत्रणांकडून करण्यात आला आहे. जमात-ए-इस्लामी हा पक्ष तारिक रहमान यांचे सरकार पाडविण्याचा प्रयत्न करत आहे. जुलैच्या वादग्रस्त चार्टरवर आधारित एक ‘क्रांतिकारी सरकार“ स्थापन करण्याचा जमात-ए-इस्लामीचा प्रयत्न असून याचा उद्देश बांगलादेशात शरिया-आधारित इस्लामिक राष्ट्राची स्थापना करणे आहे.
वृत्तसंस्था, ढाका
मोहम्मद युनूस यांच्या निकटवर्तीय युवा नेत्यांकडून स्थापन करण्यात आलेला पक्ष ‘नॅशनल सिटिजन्स“ या कथित आंदोलनाचे नेतृत्व करणार असून याचा उद्देश वर्तमान राष्ट्रपती फखरुल इस्लाम आलमगीर यांना पदावरून हटविणे आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या कटाचा खुलासा केल्यावर भारताच्या सुरक्षेशी निगडित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ढाका दनौरा केला आहे. एका अहवालानुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेच ढाका दौऱ्यावर गेले होते आणि यादरम्यान त्यांनी तारिक रहमान सरकारसोबत या मुद्द्यावर चर्चा केल्याचे समजते.
गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट
इस्लामिक आघाडीचे नेते अन् त्यांची रणनीतिक योजना तयार करण्यात सामील निवृत्त सैन्याधिकाऱ्यांचा एक समूह वर्तमान बीएनपी सरकारवर नाराज आहे कारण सरकारने ‘जुलै चार्टर“ लागू करणे आणि नवी इस्लामिक राज्यघटना स्वीकारण्यास नकार दिला आहे. भारताने बीएनपीचे समर्थन करून आणि अवामी लीगच्या मतदारांच्या मदतीने बीएनपीचा विजय निश्चित केल्याचे या गटाला वाटते. तर सत्तापालटाच्या कटाला पाकिस्तान, तुर्किये आणि अमेरिकेच्या डीप स्टेटच्या काही हिस्स्यांचे समर्थनप्राप्त असून या कटाचे मुख्य सूत्रधार मोहम्मद युनूस असल्याचे मानले जातेय.
10 हजार रायफल्स
चितगाव परिसरात जमात-ए-इस्लामीशी संबंधित कार्यकर्त्यांपर्यंत सुमारे 10 हजार असॉल्ट रायफल्स आणि विविध प्रकारचा दारूगोळा क्रिकेट किटच्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्याचा दावा आहे. तसेच हजारो तरुणांना शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा करण्यात आला
‘ऑपरेशन दमन“, ऑपरेशन दखल
कथित कटाच्या योजनेत दोन टप्पे असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात अवामी लीगची संघटनात्मक शक्ती संपवण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या टप्प्यात सत्तेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला आहे. अवामी लीगच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासह हिंदू समुदायाच्या विरोधात हिंसाचार आणि खंडणीच्या कारवायांचाही कटाच्या योजनेत समावेश असल्याचे समजते. या कटाच्या आखणीचे नेतृत्व माजी ब्रिगेडियर अब्दुल्लाहिल अमान आझमी करत असू त्यांनी सत्तेवर कब्जा करण्यासाठी दोन टप्प्यांची योजना आखली आहे.
डोवाल यांच्या दौऱ्याची चर्चा
भारताचे एनएसए अजित डोवाल यांनी 17 सप्टेंबर रोजी ढाक्याला कथितपणे भेट दिल्याचे वृत्त काही भारतीय प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या दौऱ्यादरम्यान भारत-बांगलादेश संबंध आणि सुरक्षा विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, भारत किंवा बांगलादेश सरकारने या दौऱ्याची अधिकृत पुष्टी किंवा नकार दिलेला नाही. सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात उच्चस्तरीय राजनयिक संपर्क वाढला असून तारिक रहमान यांच्या भारत दौऱ्यासंबंधीही चर्चा सुरू आहे.