भाजप नेत्यांच्या हत्येचा कट उघड
मौलवीला सुरतमधून अटक : नुपूर शर्मा, टी राजा हिटलिस्टवर
वृत्तसंस्था/ सुरत
भाजप आणि हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी सुरत येथील मौलवी मोहम्मद सोहेल उर्फ अबू-बकर तेमोल याला गुजरात गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा, तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह, हिंदू सनातन संघाचे अध्यक्ष उपदेश राणा आणि सुदर्शन टीव्हीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके असे चौघेजण हिटलिस्टवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 72 वषीय मौलवी मोहम्मद सोहेल हा मदरसा शिक्षक आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाकिस्तानमधील डोंगर आणि नेपाळच्या शहनाज अशा दोघांच्या संपर्कात होता. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनेक बाबी उघड झाल्या आहेत. त्यानुसार उपदेश राणाच्या हत्येसाठी एक कोटी ऊपयांची सुपारी घेतल्याची चर्चा दोघांमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुप्तचर माहितीनंतर पोलिसांकडून सापळा
मोहम्मद सोहेलच्या देशविरोधी कारवायांची माहिती गुप्तचर विभागाकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांची टीम सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवून होती. याचदरम्यान त्याला सुरतच्या चौक बाजार परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी उलगडल्याचे सुरत गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तानमधून शस्त्रे आयात करण्याचा कट
सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी कारवाईबाबत माहिती दिली. सदर संशयित आरोपीने एका हिंदू संघटनेच्या नेत्याच्या हत्येसाठी एक कोटी ऊपयांचे कंत्राट देण्यासाठी आणि पाकिस्तानकडून शस्त्रे खरेदी करण्यासाठी पाकिस्तान आणि नेपाळमधील लोकांसोबत कट रचत असल्याचे आढळून आले. आरोपीला पाकिस्तान आणि नेपाळमधील त्याच्या हँडलरने लाओसमध्ये एक सिमकार्डही दिले होते.
पाकिस्तानसह 5 देशांमधील हस्तकांच्या संपर्कात
अटक करण्यात आलेला आरोपी पाकिस्तान, व्हिएतनाम, इंडोनेशिया, कझाकस्तान, लाओस अशा विविध देशांचे कोड असलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्कात होता. आरोपींनी जातीय द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. भारतीय राष्ट्रध्वजाची छायाचित्रे अपलोड केली आणि हिंदू धर्माबद्दल पोस्ट किंवा व्हिडिओंमध्ये अश्लील टिप्पण्या केल्याचेही दिसून आले आहे.
विविध कलमान्वये एफआयआर
आरोपीवर आयपीसी कलम 153-ए (धर्म, वंश यांचा विनाकारण अपमान करणे किंवा हल्ला करणे), 467, 468 आणि 471 (कागदपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक नोंदी बदलणे) आणि कलम 120 (बी) अंतर्गत गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हिटलिस्टवरील नेते...
- भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा
जून 2022 मध्ये भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चर्चेदरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्मया आल्या. त्यांच्याविरोधात देशभरात निदर्शने झाली आणि गुन्हेही दाखल झाले. तसेच सरकारला अनेक इस्लामिक देशांच्या तीव्र प्रतिक्रियेला सामोरे जावे लागले. वाद वाढत असताना भाजपने नुपूर यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून हकालपट्टी केली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते.
- भाजप आमदार टी राजा सिंह
ऑगस्ट 2022 मध्ये तेलंगणातील एकमेव भाजप आमदार टी राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे मोठा गोंधळ झाला. टी राजा आपल्या जातीयवादी भाषणांमुळे अनेकदा चर्चेत असतात. 2023 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत टी राजा सिंह तिसऱ्यांदा विजयी झाले होते. त्यांनी बीआरएस उमेदवार नंदकिशोर व्यास यांचा 21 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
- हिंदू सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा
हिंदू सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांच्या हत्येचा कट रचला जात होता. मौलवी उपदेशला वेगवेगळ्या नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्मया देत होता. उपदेश राणा यांच्या हत्येसाठी एक कोटी ऊपयांची सुपारी दिल्याची बाबही व्हॉट्सअॅप चॅटमध्ये समोर आली आहे. 2019 मध्ये कमलेश तिवारीची हत्या झाल्यापासून ते निशाण्यावर होते.