सिद्धरामय्यांची बदनामी करण्याचा कट
केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा आरोप
त. भा. प्रतिनिधी / बेंगळूर
स्टिंग ऑपरेशन प्रकरणावर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मौन बाळगल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी का केली जात नाही, असा सवाल केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी उपस्थित केला. स्टिंग ऑपरेशन आपणच केल्याचे संबंधित व्यक्तीने जाहीरपणे सांगितले असतानाही तपास यंत्रणा कारवाई का करीत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
रविवारी हासन येथे पत्रकारांशी बोलताना, कर्नाटकात सिद्धरामय्या नसते तर काँग्रेस पक्ष केव्हाच संपुष्टात आला असता. आपण सिद्धरामय्या यांच्यासोबत राजकीय संघर्ष केला आहे. मात्र, आता त्यांना राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी काय-काय घडले, हे समोर येत आहे. स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सिद्धरामय्या यांची प्रतिमा मलिन करण्याचा काही जणांनी कट रचल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी केला.
संबंधित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन आपणच केल्याचे जाहीरपणे सांगितले असल्याचा उल्लेख करीत तपास सुरू करण्यासाठी आणखी कोणत्या पुराव्यांची आवश्यकता आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तीविऊद्ध कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी तपासाच्या अभावावर टीका केली.
