For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरमध्ये प्रचारसभांवर हल्ला करण्याचे कारस्थान

06:32 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरमध्ये प्रचारसभांवर हल्ला करण्याचे कारस्थान
Advertisement

लष्कर-ए-तोयबा’चा स्लीपर सेल सक्रिय

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीपूर्वी वातावरण बिघडवून दहशतवादी घटना घडवण्याचा कट पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी संघटना रचत आहेत. या योजनेबाबत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर जुनैद अहमद बट कुलगाममध्ये लपून बसला आहे. त्याने स्लीपर सेलच्या कार्यकर्त्यांसोबत बैठकही घेतल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

Advertisement

गुप्तचर यंत्रणांकडून भारतीय तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे इनपुट्स पुरविण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणेने नुकतेच सॅटेलाइट फोनद्वारे संभाषण रोखले होते. काश्मीरमध्ये पोहोचलेल्या जुनैदने 31 मार्च रोजी कुलगामच्या नौबल गावात आपल्या स्लीपर सेलशी संबंधित कार्यकर्त्यांना दहशतवाद्याच्या घरी बोलावले होते, अशी माहिती समोर आली आहे. या चर्चेवेळी स्लीपर सेलशी संबंधित 6 लोक उपस्थित होते. मात्र, त्यांची ओळख पटू शकली नाही. या बैठकीची माहिती गृह मंत्रालयाला देण्याबरोबरच काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

भाजप नेत्यांच्या सभांना धोका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी राजकीय प्रचारसभांवर हल्ला करण्यासाठी स्लीपर सेलची योजना आखली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेषत: भाजपच्या काश्मीरमधील रॅलींना लक्ष्य केले जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे. संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संशयितांवर नजर

गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार काश्मीर पोलीस, बीएसएफ आणि एनआयएचे पथक संयुक्तपणे लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जुनैद अहमद आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. इनपुट मिळाल्यानंतर बीएसएफच्या जवानांनी नौबलच्या विविध भागात संशयितांच्या घरांची झडती घेतली. पण तत्पूर्वीच दहशतवादी जुनैद आणि त्याचे साथीदार तेथून फरार झाल्याने अन्य यंत्रणांमार्फत संशयितांवर नजर ठेवली जात आहे.

Advertisement
Tags :

.