For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा निवडणुकीसाठी समितीतर्फे उमेदवार देण्याचा विचार

09:47 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभा निवडणुकीसाठी समितीतर्फे उमेदवार देण्याचा विचार
Advertisement

खानापूर म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा : फलकांवरील कन्नड सक्तीचा निषेध 

Advertisement

वार्ताहर /नंदगड

आगामी लोकसभा निवडणुकीत कारवार मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने उमेदवार उभा करण्यासाठी खानापूर तालुक्याची एक व्यापक बैठक बोलावून उमेदवार देण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. तसा विचार बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांच्या विचारातून पुढे आला. शुक्रवारी शिवस्मारकात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते. इतिहासात आतापर्यंत कारवार मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उमेदवार दिला गेला नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मते आज पर्यंत राष्ट्रीय पक्षाला जात होती. परंतु कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांचा व मराठी भाषेचा आदर केलेला नाही. कर्नाटकात आलेल्या कोणत्याही पक्षाच्या सरकारने मराठी माणसांना पायदळी तुडवण्याचाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्या तरी पक्षाला मते देऊन मोठं करण्यापेक्षा म. ए. समितीच्या उमेदवाराला मते दिलेले उत्तम होईल. त्यातच खानापूर, जोयडा, हल्याळ व कारवार तालुक्यात बहुसंख्य मराठी भाषिक आहेत. त्यांची मते निश्चितच म. ए. समितीच्या उमेदवाराला पडणार आहेत. त्यामुळे म. ए. समितीचा उमेदवार निवडून येण्याची परिस्थिती आहे. त्यामुळेच म. ए. समितीचा उमेदवार देण्याचा विचार करण्यात येत आहे.

Advertisement

सीमाभागातील दुकानावर कानडी बोर्ड लावावेत म्हणून कर्नाटक सरकारने जी सक्ती केली आहे. त्याबद्दल म. ए. समितीच्या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला.  तसेच बेळगाव येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यामध्ये पैलवानाने ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख केला होता. परंतु श्रीकांत देसाई  नामक एका उद्योजकाने यावर आक्षेप घेतला. त्याबद्दल श्रीकांत देसाई यांचा या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला. त्यातच म. ए. समितीचे नेते शुभम शेळके यांना कर्नाटक सरकारच्या पोलिसांनी अटक केली. त्याबद्दल पोलिसांचा व कर्नाटक सरकारचा निषेध बैठकीत व्यक्त करण्यात आला. सीमाप्रश्नासंबंधीचा दावा सुप्रीम कोर्टात सुरू आहे. एक ना एक दिवस हा सीमाप्रश्न सुटून सीमाभाग महाराष्ट्रात जाणार आहे. तरी सीमाप्रश्न ज्वलंत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. सीमाभागातील जास्तीत जास्त मराठी माणसांनी सीमाप्रश्नाच्या प्रत्येक लढ्यात व बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीत सचिव आबासाहेब दळवी, खजिनदार संजय पाटील, म. ए. समितीचे नेते मुरलीधर पाटील, अॅड. अरुण सरदेसाई, मारुती परमेकर, गोपाळ पाटील, निरंजन सरदेसाई, प्रकाश चव्हाण, पांडुरंग सावंत, रणजीत पाटील, रमेश धबाले, राजाराम देसाई, जयराम देसाई, बाळासाहेब शेलार, मुकुंद पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.