'ओंकार' हत्तीच्या दहशतीवर वनविभागाचा 'वॉर रूम' प्लॅन
आठ दिवसात पकडणार; उपवनसंरक्षक शर्मा यांचे संजू परबांना आश्वासन
सावंतवाडी । प्रतिनिधी
मडुरा, सातोस आणि कास परिसरात 'ओंकार' नावाच्या हत्तीने केलेल्या धुमाकुळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाकडे धाव घेतली. हत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकडे लक्ष वेधून 'ओंकार' हत्तीला तातडीने पकडण्यात यावे, अशी मागणी परब यांनी ग्रामस्थांतर्फे वनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर, उपवनसंरक्षक शर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील आठ दिवसांत हत्तीला पकडण्याचे आश्वासन दिले आहे. मडुरा, सातोसे आणि कास या गावांमध्ये रात्रीच्या वेळी हत्तीचा वावर वाढला आहे. शेतात शिरून 'ओंकार' हत्तीने पिकांचे मोठे नुकसान केले असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ग्रामस्थांच्या या गंभीर तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी, यासाठी संजू परब यांच्या शिष्टमंडळाने वनविभागाला निवेदन सादर केले.निवेदन स्वीकारल्यानंतर वनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी जिल्हाप्रमुख संजू परब आणि उपस्थित ग्रामस्थांना सांगितले की, 'ओंकार' हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून, युद्धपातळीवर काम सुरू आहे.
शर्मा यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, "पुढील आठ दिवसांत हत्तीला पकडण्यात निश्चितपणे यश येईल." यामुळे त्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उपवनसंरक्षक शर्मा यांनी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाच्या निकषानुसार उपलब्ध ती मदत त्वरित देण्यात येईल, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.यावेळी उपसरपंच बाळू गावडे, सोमनाथ परब, दिलीप परब, नारायण परब, ज्ञानेश्वर परब, मनोहर परब, संतोष जाधव, प्रशांत परब, प्रशांत साटेलकर आणि परीक्षित मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. वनविभागाच्या या त्वरित आणि सकारात्मक कारवाईच्या आश्वासनाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून, 'ओंकार' हत्तीच्या दहशतीपासून लवकरच गावकऱ्यांची सुटका होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.