रंकाळा तलावाचे संवर्धन कागदावरच...मनपा प्रशासनाचे दुलर्क्ष बाधा पोहोचविणारे
सुशोभिकरण जोमात मात्र मुळ दुखणे बाजूलाच : लाईट नसल्याने प्रेमी युगुलांचे अश्लिल चाळे, ओपनबारची चलती : विद्युत रोषणाई, कारंजा, गाळ काढणे, हेरीटेज वॉक, सेल्फी पाईंटची कामे हवेतच : नागरिक व पर्यटकांचा हिरमोड : मुलांची खेळणी मोडकळीस : निधी अभावी रखडले फुटपाथवरील ग्रीलचे काम
इम्रान गवंडी कोल्हापूर
कोल्हापुरचे ऐतिहासिक वैभव व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या रंकाळा तलावाच्या सुशोभिकरणाचे काम जोमात सुरू असले तरी प्रदुषणाचे दुखणे मात्र कायम आहे. रंकाळा तलाव संवर्धनासाठी निधी येऊन सुद्धा प्रदुषण रोखण्यात मनपा अपयशी ठरली आहे. सुशोभिकरणाला विरोध नाही मात्र प्रदुषणाचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निधी आहे मात्र संवर्धन कागदावर अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जावळाचा गणपती ते डी-मार्ट पर्यंतच्या फुटपाथवरील संरक्षण जाळीचे काम निधी अभावी रखडले आहे. रंकाळा चौपाटी, राजर्षी शाहू स्मृती उद्यान, संध्यामठ, पदपथ उद्यान, नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावर लाईटच नसल्याने हातात मोबईलचा टॉर्च घेऊन रस्ता शोधावा लागत आहे. अंधाऱ्याचा फायदा घेत अश्लिल चाळे करणाऱ्या प्रेमी युगुल व मद्यपींचा वावरही वाढला आहे. यामुळे सायंकाळनंतर रंकाळा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिक व पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीतून रंकाळ्याला ऊर्जितावस्था आणू असे सांगितले जात आहे. यामध्ये तलावातील गाळ काढून पाणी स्वच्छ करणे, सुशोभीकरणामुळे रंकाळ्याला गतवैभव प्राप्त करून देणे, तलावात विद्युत रोषणाईसह कारंजा, हेरीटेज वॉक, संध्यामठ परिसरात सेल्फी पॉईंट उभारणे ही कामे केली जाणार आहेत. मात्र गेल्या दिड वर्षापासून यातील एकाही कामाला सुरूवात झालेली नाही. केवळ फुटलेल्या फरशा बसविणे, झाडे लावणे, डागडूजीकरणे एवढयाच कामावर समाधान मानले जात आहे. रंकाळा तलावाला गतवैभव द्यायचे तर मुळ दुखणे दुर करूनच सुशोभिकरण करणे गरजेचे आहे.
निधीतून होत असलेली कामे
राज्य शासनाने रंकाळा तलावासाठी 20 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. यातील 2 कोटी 57 लाखामधुन पेव्हिंग ब्लॉक, जुनी फरशी काढणे, चौपाटीच्या दगडी घडीव कामाचे फिनिशींग, राजहंस इंट्री टॉवर, पार्किंग व्यवस्था, डागडूजी, अपुरा पदपथ पूर्ण करणे, स्वागत कमानी, तलावाच्या भिंतींचे संवर्धन, घाट दुरुस्ती करणे आदी कामे सुरू आहेत. तर 9 कोटी 85 लाख संवर्धनासाठी खर्च केले जात असले तरीही प्रदुषणाचा प्रश्न सुटलेला नाही.
रंकाळा संवर्धन कागदवरच
रंकाळा तलाव आणि दुर्गंधी हे समीकरणच बनले आहे. रंकाळ्यात मिसळणारे दुषित पाणी रोखण्यास महापालिका अपयशी ठरली आहे. रंकाळा प्रदुषण मुक्तीसाठी कोट्यावधींच्या निधी देवूनही संबंधित विभाग करतो तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रंकाळा तलावाच्या अस्त्वालाच बाधा पोहचत असल्याच्या भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत. महापालिका कागदी घोडे नाचवत संवर्धनाचा दिखावा करत आहे.
मनपाचा दिखावा
गेल्या दोन महिन्यापुर्वी रंकाळा तलावातील मासे मृत झाले होते. मृत माशांचा खच पडला होता. यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली होती. मनपाकडून पाण्याचे नमुनेही तपासण्यासाठी घेतले होते. याचे पुढे काय झाले? हा प्रश्न निरूत्तरच आहे. मनपाकडून तपासणीचा नुसता दिखवाच केला जात आहे.
खेळणी मोडकळीस
रंकाळा चौपाटी, जुना वाशीनाका येथील उद्यान व पदपथ उद्यान येथील लहान मुलांची खेळणी मोडकळली आहे. झोपाळे गायब होऊन नुसता सांगाडाच शिल्लक राहीला आहे. काही झोपाळे तुटण्याच्या स्थितीत आहे. खेळण्याच्या ठिकाणी वाळूच नसल्याने मुले पडून जखमी होत आहेत.
सुशोभिकरण व संवर्धनाबाबत बैठक
बंद असलेली लाईट तत्काळ सुरू करण्यात येईल. नव्याने विकसित झालेल्या कौनिक्स टेक्नॉलॉजीचा वापर करून गाळ काढणे, पाणी शुद्धीकरण, पाण्याचे नमुने तपासणे आदी प्रक्रीया केली जाणार आहे. यासाठी टेंडर व निविदा काढली आहे. सांडपाणी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संवर्धन व सुशोभिकरणाबाबत प्रशासकीय बैठकीचे आयोजन केले आहे.
नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका