पश्चिम महाराष्ट्रातील चाळीस बोलींचे संवर्धन
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात आज पश्चिम महाराष्ट्रातील 40 बोलीभाषांचा अभ्यास केला जात आहे. जिल्ह्यातील विशेषत: चंदगडी ही मराठीतील वैशिष्ट्यापूर्ण बोली आहे. यावर डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. गोपाळ गावडे यांनी पुस्तके लिहिली. ज्येष्ठ साहित्यिक गणेश देवींच्या प्रकल्पामुळे चंदगडी बोलीचा युजीसीने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश केला आहे. गुरूवारी, 27 रोजी मराठी भाषा गौरव दिन आहे. यानिमित्त चंदगडी बोलीला मिळालेली प्रतिष्ठा महत्वपूर्ण आहे.
विद्यापीठात मराठी अधिविभागाची स्थापना 1979 साली झाली. गेल्या 45 वर्षात विभागात बोलीभाषांवर अभ्यास सुरू आहे. कोल्हापुरात सीमा भागातील सर्व प्रदेशातील बोलीभाषा, गोसावी, नंदिवाले, वडर, कैकाडी, कोरवी समाजासह तंजावार, गोवा, मॉरीशसमधील मराठी बोलीवर प्रकाश टाकला आहे. मराठी समुहांच्या जनावर, कापड व्यापाऱ्यांची कोड लँगवेज व मातंग समाजातील पारोसी बोलीचाही अभ्यास केला जात आहे. कारण मराठी भाषेचे अस्तित्व आणि महत्व बोलांवर अवलंबून आहे.
चंदगडी भाषेवर कुडाळी, इंग्रजी, पोर्तुगीज, शिवकालीन, कोकणी भाषेचा प्रभाव आहे. चंदगडी ही दोन लाख लोकांची बोलीभाषा आहे. येथील लोकांशिवाय इतरांना ती इतरांना कळू शकत नाही. विभागात चंदगडी भाषेवर अभ्यास झाल्याने ऱ्हास होत चाललेल्या या बोलीला प्रतिष्ठा मिळाली. चंदगडी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश झाल्याने, आपली बोली महत्वाची असल्याची जाणीव तरूणाईला झाली. त्यामुळे चंदगडी संस्कृतीचे दर्शन सोशल मिडियावर होत आहे. विभागात सर्व बोलीभाषांचा अभ्यास होत असल्याने हा मराठी विभाग राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अग्रेसर आहे.
साहित्यिक रणजीत देसाई, शिवाजी सावंत, राजन गवस, कृष्णात खोत यांच्या कादंबऱ्यातील कोल्हापुरी भाषेचा अभ्यास अनेक संशोधकांनी केला आहे. विशेषत: खोत यांच्या कादंबरीतील पन्हाळगडाच्या पायथ्याशी वापरल्या जाणाऱ्या बोलीचाही लेखक, समीक्षकांनी अभ्यास केला आहे. डॉ. रणधीर शिंदे यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या भाषेबद्दल लेखन करून मराठीच्या सौंदर्यात भर घातली आहे.
- हे अभ्यासक करतात भाषांवर संशोधन
सुमन बेलवलकर यांनी लीळाचरित्रातील समाजदर्शन याचा अभ्यास केला, सध्या प्रांजली क्षीरसागर या भाषेची उत्पत्ती, शोध, उगम व वाटचाल’, हिना दळवी या ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील भाषा’ यावर तर शीतल पटले ‘नंदुरबार परिसरातील पावरी बोलीवर संशोधन करत आहेत.
- सोशल मिडिया मुक्त व्यासपीठ
मराठीतील बोलीभाषा तंत्रज्ञानामुळे सुलभ होत आहे. सोशल मिडीयावर बोली लेखन, चिन्ह, ध्वनी रूपात राज्य करत आहेत. सोशल मिडीयामुळे बोली भाषेचे लोकशाहीकरण झाले आहे. काळानुसार वाडीवस्तीपासून ते उच्च पदस्थांपर्यंत सोशल मिडिया हे भावनाविष्कार करण्याचे मुक्त व्यासपीठ बनले आहे.

- लोकसंस्कृतीतून भाषेचे संवर्धन
चंदगडीसह पश्चिम महाराष्ट्रातील बोलीभाषेत पाळणा, लोकगीत, लग्नातील गाणी, दिवाळी, गैरी-गणपती, हादग्याच्या गीतांमधून बोलीचे संवर्धन केले जात आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने बोलीभाषेची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळाली आहे. बोलीभाषेचा जास्तीत जास्त अभ्यास होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
डॉ. नंदकुमार मोरे, अधिविभागप्रमुख, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ

- बोलीभाषेच्या अभ्यासातून महत्व वाढते
प्राचीन व आधुनिक मराठी साहित्यातील भाषा वाटचालीचा अभ्यास केला जात आहे. बोलीभाषांच्या अभ्यासातून त्या त्या भाषांना महत्व प्राप्त होते.
डॉ. रणधीर शिंदे, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ)