शक्तीपीठ महामार्गासाठी संवादातून सहमतीचे पाऊल – आमदार क्षीरसागर
कोल्हापूर :
शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यात औद्योगिक, आयटी तसेच पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. या महामार्गामुळे कोल्हापूरचा ग्रामीण भाग, विशेषतः भुदरगडसारखा टोकाचा तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी महामार्गाला पाठिंबा दिला असून, त्यांच्या शिष्टमंडळाची आणि प्रशासनाची संयुक्त बैठक मुंबईत यशस्वीरीत्या पार पडली.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. कोणावरही अन्याय न होता संवादातून सहमतीचे पाऊल उचलले जाणार आहे."
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले. "महामार्गास विरोध हा फक्त राजकारणासाठी असून, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनास मान्यता देऊन सातबारेही सादर केले आहेत. त्यामुळे विरोधकांनी राजकारण न करता विकासाला प्राधान्य द्यावे," असे आवाहन त्यांनी केले.
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ जपान, साऊथ कोरिया व जर्मनीइतके आहे, मात्र त्या देशांमध्ये हजारो किमीचे एक्स्प्रेस महामार्ग आहेत. समृद्धी महामार्गाचा विकास अनुभव लक्षात घेता, शक्तीपीठ महामार्गामुळेही रोजगार, शेतीमालासाठी बाजारपेठा आणि जलद दळणवळणाची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
महामार्गाच्या रुंदीबाबत चुकीची माहिती पसरवली जात असून, प्रत्यक्षात महामार्गाची रुंदी फक्त १०० ते ११० मीटर असणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहन आणि बैलगाड्यांसाठी मार्ग उपलब्ध असणार आहे. शेतकऱ्यांना बाजारभावानुसार भरपाई दिली जाणार आहे. पूरप्रवण क्षेत्रांमध्ये पुलांवरून रस्ता नेण्यात येईल, तसेच देवस्थान, ब वर्ग व पतसंस्थांच्या जमिनी कसणाऱ्यांना नुकसान न होता योग्य मोबदला दिला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीचे अध्यक्ष दौलतराव जाधव, माजी महापौर राजू शिंगार्डे, नवनाथ पाटील, अमोल मगदूम, सचिन लंबे, रोहित बाणदार, राम अकोळकर, दत्तात्रय कुलकर्णी, कमलाकर जगदाळे, किशोर घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.