For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भावनिक बुद्धिमत्ता चांगली असण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न गरजेचे

06:49 AM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
भावनिक बुद्धिमत्ता चांगली असण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न गरजेचे
Advertisement

माणूस जसा सामाजिक प्राणी आहे, तसाच तो भावनात्मक प्राणीदेखील आहे. ईमोशन हा शब्द ई-मोशन म्हणून बघितला जाऊ शकतो. भावनांमध्ये नैसर्गिकरीत्याच एक शक्ती दडलेली असते. हीच शक्ती माणसाला कृती करण्यास भाग पाडते. माणसाला जसा तर्कसंगत, वस्तुनिष्ठ विचार करता येतो, तितकंच भावनेच्या आहारीही जाता येतं. खरं तर मनुष्य आयुष्यातील पुष्कळ गोष्टी भावनेमुळेच करतो असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. मैत्रीपासून प्रेमापर्यंत आणि मुलांच्या संगोपनापासून वृद्ध आई-वडिलांच्या देखभालीपर्यंत माणसातील भावनाच त्याला मार्गदर्शन करत असतात. या अर्थातच चांगल्या भावना आहेत. पण वाईट भावनादेखील माणसाला तितक्याच किंवा जास्त प्रवृत्त करतात. गुन्हे, भ्रष्टाचार किंवा अपराधांमध्ये भावनाच दडलेल्या असतात. असं भावनांचं आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकं असूनदेखील भावनांचा फारसा शास्त्रशुद्धरीत्या अभ्यास केला गेलेला नाही. तुम्ही बऱ्याच वेळा हे ऐकलं असेल की जितका बुद्ध्यांक महत्त्वाचा आहे, तितकाच भावनांक देखील महत्त्वाचा आहे. म्हणजेच इंटेलेजन्स कोशंट (आय क्यू) इतकाच इमोशनल कोशंट (ईक्यू) देखील महत्त्वाचा आहे. काही क्षेत्रे तर अशी आहेत की जिथे उच्च भावनांक असलेल्या उमेदवाराला पसंती दिली जाते. गेल्या काही काळात जास्त भावनांक असलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी वाढत असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ञांनी नोंदवले आहे. असा एक अनुभव असतो की नोकरी इच्छुक उमेदवार हे बहुतांश वेळा आपल्या तांत्रिक कौशल्याबद्दल आणि वैयक्तिक यश संपादनाबद्दल भरमसाठ गोष्टी आपल्याला बायो-डेटा किंवा सीव्हीवर लिहिताना दिसतात. बऱ्याचदा इंटरव्यूमध्ये देखील उमेदवार आपल्या तांत्रिक कौशल्याची, विविध परीक्षांमध्ये मिळालेल्या यशाची उजळणी पुन्हा पुन्हा करताना दिसतात. पण तुम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे का, कामात यशस्वी होण्यासाठी काही वेगळ्या कौशल्यांबद्दल आता बोललं जात आहे. बऱ्याचदा असं होतं की काही खास कौशल्यं असून करिअरमध्ये तुमची प्रगती होईल याची शाश्वती देता येत नाही पण एक असं कौशल्य आहे की जर ते तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही आत्मसात केलं तर तुमच्या यशाची खात्री आहे असं तज्ञ वारंवार सांगत आहेत...आणि ते कौशल्य आहे ‘इमोशनल इंटेलिजन्स’. याच कारणामुळे विविध क्षेत्रातील लीडर्स किंवा टॉप मॅनेजर्स हे ‘इमोशनल इंटेलिजन्स’ अधिक असलेल्या उमेदवाराचा शोध घेताना दिसत आहेत. इमोशनल इंटेलिजन्स अर्थात ई क्यूची बोर्डरूममध्ये खूप चर्चा होताना दिसत आहे.

Advertisement

डॅनियल गोलमन या शास्त्रज्ञाने भावनांक अर्थात ईक्यूची संकल्पना मांडली. 1996मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात ही संकल्पना उलगडून सांगितली आहे. आयक्यू (बुद्ध्यांक) ची संकल्पना माणसाच्या बौद्धिक क्षमतेवर आधारित आहे. माणसाची बौद्धिक क्षमता चांगली असल्यास त्याला आपोआपच यश मिळतं, असं समजलं जाई. परंतु गोलमनने म्हटलं आहे “पूर्वी तुमची कार्यकौशल्यं यशासाठी पुरेशी होती, पण आज तुमची भावनिक व सामाजिक कौशल्यं दाखवण्याची गरज आहे.”

बुद्धिमत्ता वेगवेगळ्या प्रकारची असते. यात भावनिक बुद्ध्यांक जास्त असणे हे आजकालच्या जगात खूप महत्त्वाचे आहे. व्यावसायिक क्षेत्रात मुलाखत घेताना उमेदवाराचा ईक्यू आवर्जून तपासला जातो. फक्त नोकरीच्या ठिकाणी नाही तर कोणत्याही नातेसंबंधांत यशस्वी होण्यासाठी भावनांक चांगला असावा लागतो. भावनांक अथवा भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वत:च्या तसेच इतरांच्या भावना नीट समजून घेणे, त्यांचा योग्य रीतीने वापर करणे तसेच भावनांचे योग्य प्रकारे नियोजन करणे. भावनिक बुद्धिमत्ता कुठे वापरली जाते? प्रभावी संवाद किंवा सुसंवाद साधण्यासाठी. सह अनुभूती म्हणजे एम्पथी अर्थात स्वत:ला दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी ठेवून त्यानुसार विचार करण्याची क्षमता. आव्हानांचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी. संघर्षमय प्रसंगात मध्यममार्ग काढण्यासाठी. ताणतणावांचे योग्य नियोजन करण्यासाठी. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की रोजच्या जीवनातील प्रसंग अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी आपली भावनिक बुद्धिमत्ता चांगली असली पाहिजे. व्यावसायिक क्षेत्रात भावनांक चांगला असलेले कर्मचारी अधिक सक्षमपणे काम करू शकतात. त्यामुळे याचा फायदा अंतिमत: कंपनीला होतो. याशिवाय मैत्री किंवा नातेसंबंध जपण्यासाठी आपल्या तसेच इतरांच्या भावना नीट ओळखून त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. थोडक्यात स्वत:चे आयुष्य समाधानकारक पद्धतीने जगण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता फार महत्त्वाची आहे.काम करणे म्हणजे नेमके काय? याबाबत व्यवस्थापन शास्त्रातील तज्ञ काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. ‘तसं पाहायला गेलं तर, काम करणं म्हणजे आपल्या कामकाजविषयक नातेसंबंधातील गुणवत्ता वाढवणे,’ असं युकेतील अॅमी ब्रॅडली सांगतात. अॅमी या ‘हंट इंटरनॅशनल बिजनेस स्कूल’मध्ये व्यवस्थापन आणि नेतृत्व या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या सांगतात, ‘काम हे लोकांकडूनच करून घेतलं जातं किंवा केलं जातं. जर तुम्ही तुमच्या स्वत:च्या भावना किंवा इतरांच्या भावनांना समजून काम करू नाही शकला तर दीर्घकाळासाठी कार्यक्षमता टिकून राहणे अत्यंत कठीण होऊन जाईल.’ त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच मार्क क्रेमरदेखील इमोशनल इंटेलिजन्स महत्त्वाचा आहे असं सांगतात.  ‘तुम्ही कठीण प्रसंगात कसे वागता, संघर्षाची स्थितीत कसे वागता, मोठा धक्का बसला तर कसे वागता, जर तुमच्यापैकी एखाद्या सहकाऱ्याला नैराश्य वाटत असेल तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी कसं वागता, परिस्थितीशी कसं जुळवून घेऊन काम करता, मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी कशा वाटाघाटी करता, या सर्व गोष्टी इमोशनल इंटेलिजन्समध्ये येतात,’ असं क्रेमर सांगतात.

Advertisement

प्रा. डॉ. गिरीश नाईक

Advertisement
Tags :

.