कॉनर एस्टरहुइझेन आयसीसी टी-20 क्रमवारीत 39 व्या स्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
द. आफ्रिकेचा फलंदाज कॉनर एस्टरहुइझेनने न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे आयसीसीच्या ताज्या पुरूष टी-20 आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या क्रमवारीत लक्षणीय झेप घेतली आहे. एस्टरहुइझेन टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत पहिल्या 100 च्या आत 39 व्या स्थानावर पोहोचला आहे.
या 24 वर्षीय खेळाडूने पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 200 धावा केल्या आणि मालिकावीर पुरस्कार जिंकला. त्याच्या योगदानामुळे दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडच्या भूमीवर ही मालिका 3-2 ने जिंकण्यास मदत झाली. न्यूझीलंडचा यष्टीरक्षक टिम रॉबिन्सनच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. प्रोटीजविरुद्ध 81 धावा केल्यानंतर तो दोन स्थानांनी वर चढून संयुक्त 32 व्या स्थानावर पोहोचला. भारताचे अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल दोन स्थाने कायम राखली आहेत. तर इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जोस बटलर (एका स्थानाने वर चढून आठव्या स्थानावर) आणि न्यूझीलंडचा टिम सेफर्ट (एका स्थानाने खाली घसरुन नवव्या स्थानावर) हेच खेळाडू या आठवड्यात अव्वल 20 खेळाडूंमध्ये बदललेले दिसले आहेत.
टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणचा फिरकी गोलंदाज रशीद खान अव्वल स्थानी कायम आहे तर न्यूझीलंडविरुद्धच्या कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेचे अनेक खेळाडू क्रमवारीत सर्वाधिक प्रगती करणारे खेळाडू म्हणून उदयास आले आहेत.
वेगवान गोलंदाजांची त्रयी जेराल्ड कोएत्झी (36 स्थानांनी वर चढून संयुक्त 52 व्या स्थानावर), ऑटनील बार्टमन (10 स्थानांनी वर चढून 56 व्या स्थानावर) आणि जॉर्ज लिंडे (सहा स्थानांनी वर चडून संयुक्त 62 व्या स्थानावर), या सर्वांनी क्रमवारीत आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज झॅकॅरी फॉल्क्स (11 स्थानांनी वर चढून 70 व्या स्थानावर) यालाही त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.
झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा पुरूषांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. तर कोएत्झी या आठवड्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आठ बळी घेतले आणि 18 धावा केल्या. ज्यामुळे तो 14 स्थानांनी वर चढून संयुक्त 72 व्या स्थानावर पोहोचला आहे.