बेरोजगारीविरोधात काँग्रेसचा मोर्चा
तेरा मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेऊन संध्याकाळी केली सुटका
पणजी : येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात गोवा प्रदेश काँग्रेस समितीचा शपथविधी समारंभ आणि राज्य कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर सहभागी काँग्रेस कार्यकर्ते सभागृहाबाहेर जमले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निषेध मोर्चा सुरू केला. तथापि, त्यांना आझाद मैदानाजवळ पोलिसांनी थांबवले आणि 13 निदर्शकांना ताब्यात घेऊन आगशी पोलिसस्थानकात नेले. युवक काँग्रेसने बेरोजगारी व महागाईविरोधात राजधानीत मोर्चा काढला. ‘आम्हाला आश्वासने नव्हे, तर काम हवे आहे’. असे लिहिलेले फलक त्यांच्या हातात होते. काँग्रेस विधीमंडळ नेते युरी आलेमाव, पक्षाच्या सहप्रभारी अंजली निंबाळकर, आल्तिनो गोम्स, युवा काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गिरीश चोडणकर, सुनील कवठणकर, वीरेंद्र शिरोडकर, नौशाद चौधरी, समील वळवईकर, आणि सुमारे 350 कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अर्चित नाईक यांनी गोव्यातील तऊणांमधील वाढत्या बेरोजगारीबद्दल सत्ताधारी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार नोकऱ्या देण्यात अपयशी ठरले आहेत. युवकांशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्यासाठी आणि अन्यायाविऊद्ध लढण्यासाठी काँग्रेसतर्फे 100 तऊणांना पदाधिकारी म्हणून प्रशिक्षित केले जाईल, असेही ते म्हणाले. युरी आलेमाव यांनी सांगितले की, युवक काँग्रेस गोव्यात बेरोजगारीविऊद्ध निदर्शने करत आहे. बेरोजगारीच्या संकटासाठी भाजप सरकार जबाबदार आहे. निदर्शने थांबवल्याबद्दल आणि सहभागींना गैरवर्तन केल्याबद्दल त्यांनी पोलिसांवर टीका केली. निदर्शने शांततेत संपली. त्यानंतर 3.45 वाजता ताब्यात घेतलेल्या 13 निदर्शकांना सोडण्यात आले.