काँग्रेसचे पाटकर यांच्या आरोपामुळे मंत्री राणे संतापले
पोलीस महासंचालकांना निवेदन सादर : गरज पडल्यास पाटकर विरोधात कायदेशीर कारवाई
पणजी/ विशेष प्रतिनिधी
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे बरेच संतापलेले असून काल त्यांनी पोलीस महासंचालक अनुप कुमार यांना एक निवेदनदेखील सादर करून अमित पाटकर यांनी केलेल्या निवेदनाची सखोल व रितसर चौकशी करण्याची मागणी करण्याचे ठरविले आहे. तसेच गरज पडल्यास पाटकर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा दिला आहे.
नोकऱ्यांसाठी पैसे या विषयावरील लढाई आता राजकीयदृष्ट्या सुरू झाली आहे. काँग्रेस नेते अमित पाटकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका मंत्र्याचा आवाज एका महिलेशी बोलताना प्रसारित केला आणि त्यावरून बरेच वादळ उठले आहे. यानंतर सायंकाळी आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी या प्रकरणी संताप व्यक्त करून पोलीस महासंचालकांपर्यंत रविवारी रितसर तक्रार करण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर त्यांनी सादर केलेले ऑडिओ क्लिप हे कधीचे व त्यामध्ये असलेला आवाज कोणाचा याची देखील रितसर चौकशी करण्याची मागणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पाटकर यांच्याकडून मूळ सर्व कागदपत्रे व दस्तावेज ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना विनंती करण्याचे ठरविले आहे .त्याचबरोबर त्यांनी सादर केलेले पुरावे व त्यांनी सादर केलेली माहिती चुकीची असल्यास त्यांच्याविऊद्ध आपण कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिल्याने आता या प्रकरणी राजकीय लढाई देखील जोरदारपणे सुरू झाल्याचे दिसून येते.