काँग्रेसची न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये
दोन दिवस यात्रेला विश्रांती : राहुल गांधी दिल्लीत
वृत्तसंस्था /कोलकाता
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा गुऊवारी (25 जानेवारी) बारावा दिवस होता. आसाम येथून सकाळी आठ वाजता प्रवास सुरू झाल्यानंतर. 11.30 च्या सुमारास यात्रा पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील बक्षीरहाट येथे पोहोचली. येथे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी राहुल गांधींचे स्वागत केले. येथे प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राहुल यांनी इंडिया आघाडीच्या एकतेवर विश्वास व्यक्त केला. सध्या देशात अन्याय होत असल्याने या यात्रेच्या नावाला न्याय हा शब्द जोडण्यात आला आहे. या अन्यायाविऊद्ध इंडिया आघाडी एकत्रितपणे लढा देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा बंगालमध्ये दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी कूचबिहार शहरातील माँ भवानी चौकातून पायी प्रवास केला. यानंतर ही यात्रा बसने गोक्सडांगा आणि नंतर अलीपुरद्वार जिल्ह्यातील फलकाटा येथे पोहोचली. आता 26 आणि 27 जानेवारीला यात्रेमध्ये विश्रांतीचे दिवस निश्चित करण्यात आले आहे. या विश्रांतीदरम्यान राहुल गांधी दिल्लीला रवाना झाले आहेत. 28 जानेवारीला हा प्रवास पुन्हा सुरू होईल. येथून ते जलपैगुडी, अलीपुरदूर, उत्तर दिनाजपूर आणि दार्जिलिंगमार्गे 29 जानेवारीला बिहारमध्ये प्रवेश करेल. 31 जानेवारीला ही यात्रा पुन्हा पश्चिम बंगालमधून मालदामध्ये प्रवेश करेल आणि मुर्शिदाबादला पोहोचेल.
ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केल्यापासून ‘इंडिया’ आघाडीमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. याचदरम्यान राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीबाबत भाष्य करत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी इंडिया आघाडी संयुक्तपणे लढणार असल्याचे स्पष्ट केले. ममता बॅनर्जी यांनी एक दिवसापूर्वी बंगालमधील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत जागा वाटून घेण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधी यांचे हे वक्तव्य आले आहे. तसेच राहुल गांधींच्या न्याय यात्रेची माहितीही आम्हाला देण्यात आली नव्हती, असेही ममता म्हणाल्या होत्या. आम्हाला यात्रेत सहभागी होण्यास सांगण्यात आलेले नसल्यामुळे तृणमूल काँग्रेस यात सहभागी होणार नाही, असेही ममतांनी जाहीर केले होते.
अधीर रंजन चौधरींवर तृणमूलची आगपाखड
दुसरीकडे, टीएमसीचे राज्यसभा नेते डेरेक ओब्रायन यांनी भारतात दोन मुख्य विरोधक आहेत - पहिला भाजप आणि दुसरा अधीर रंजन चौधरी असे सूचक वक्तव्य केले होते. अधीर रंजन चौधरी नेहमीच भाजपची भाषा बोलतात. बंगालमध्ये युती न होण्याची तीनच कारणे आहेत, “अधीर चौधरी, अधीर चौधरी आणि अधीर चौधरी” असे वक्तव्य केल्याने दोन्ही पक्षातील दरी वाढल्याचे दिसून येत आहे.