दरवाढी विरोधात काँग्रेसचे भव्य आंदोलन
27 किंवा 28 रोजी सीपीएड् मैदानावर आयोजन : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
बेळगाव : आवश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने 27 किंवा 28 एप्रिल रोजी सीपीएड् मैदानावर भव्य आंदोलन केले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील जिल्हा काँग्रेस भवनात मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी बोलताना म्हणाले, अलीकडेच दरवाढीविरोधात बेंगळूर येथे काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. यानंतर आता बेळगावातदेखील भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनात अंदाजे 30 हजार काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील, असे ते म्हणाले. गेल्या 11 वर्षांत केंद्र सरकारच्यावतीने अनेकवेळा दरवाढ करण्यात आली आहे. दरवाढीविरोधात आपल्याकडे पुरावे आहेत.
मात्र, आपले झाकून ठेवून भाजपच्यावतीने जनआक्रोश आंदोलन केले जात आहे. लोकांसमोर खरे सत्य बाहेर यावे यासाठी केंद्र सरकारच्याविरोधात मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून दरवाढ हे एकच काम झाले आहे. दरवाढ करण्यासह संविधानाचा अवमान केला जात आहे. त्यामुळेच पेंद्र सरकारला इशारा देण्याच्या दृष्टिकोनातून बेळगाव आणि चिकोडी काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन केले जाणार आहे, असे ते म्हणाले. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, केंद्र सरकारविरोधात दरवाढ आणि संविधान बचाव आंदोलन केले जाणार आहे. केंद्र सरकारने गॅस सिलिंडर, खाद्यतेल, दैनंदिन वस्तू, सिमेंट, खत, औषधे आदींची दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळेच राज्यात गॅरंटी योजना जारी करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या धोरणामुळेच सर्व वस्तूंचे दर वाढले आहेत. मात्र भाजपच्यावतीने जनआक्रोश आंदोलन केले जात आहे.