काँग्रेसचा निवडणुकीतील निकालाविरोधात न्यायालयीन संघर्ष
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या दिग्गजांचा झालेला पराभव हा काँग्रेसला अजुनही पचवता येत नाही, लोकसभेला महाराष्ट्रात 13 जागांवर विजय मिळालेल्या काँग्रेसला विधानसभेला अवघ्या 10 जागांवर रोखण्यात आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या मविआच्या 100 पराभूत उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
.काँग्रेसने राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात राज्यभर आंदोलन केले, काही वर्षापूर्वी काँग्रेसने एखादा कार्यक्रम किंवा अभियानाची घोषणा केली तर त्याचे पडसाद हे राज्यभरात उमटत होते. मात्र काँग्रेसमध्ये आलेली मरगळ, महत्त्वाच्या नेत्यांनी केलेला पक्षत्याग यामुळे आज काँग्रेसची भूमिका ही सर्वसामान्य लोकांपर्यत कुठे तरी पोहचत नाही. महाविकास आघाडीची भूमिका हीच काँग्रेसची भूमिका आत्तापर्यत राहीली होती. आत्ता मात्र काँग्रेसने निवडणूक निकालाविरोधात न्यायालयीन संघर्षाचा आवाज उठविला आहे.
लोकसभा निकालानंतर विधानसभा निवडणूक निकालात सगळ्यात मोठा फटका कोणाला बसला असेल तर तो काँग्रेसला. निवडणुकीच्या निकालाआधी काँग्रेसमधील वजनदार नेते मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत होते, तर काही नेते महत्त्वाची खाती आपल्याकडेच राहतील या आविर्भावात होते, या सगळ्या नेत्यांना निकालाने क्षणात जमिनीवर आणले. लोकसभा निकालानंतर राज्यातील 48 पैकी 13 जागा जिंकताना भाजपला मागे सारणाऱ्या काँग्रेसचा आत्मविश्वास इतका वाढला की, थेट मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण ही चर्चाच काँग्रेसमध्ये सुरू झाली, याचा परिणाम महाविकास आघाडीवर झाल्याचे कुठे तरी पहायला मिळाले. काँग्रेससोबत लढल्याने मोठा फटका शिवसेनेला बसल्याचे मानत महाविकास आघाडीत आहोत, असे सांगत दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे कधीही एकत्र येण्याच्या चर्चांना अद्याप पूर्ण विराम मिळालेला नाही. काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर आलेली मरगळ अद्याप दूर झालेली नाही. राष्ट्रीय पातळीवरून दिलेला कार्यक्रम राबिवणे हाच राज्यातील काँग्रेसचा अजेंडा पहायला मिळत आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे 16 आमदार असलेल्या काँग्रेसने अद्याप विधीमंडळ गटनेता निवडलेला नाही. त्यातच गेल्या आठवड्यात काँग्रेसचे 5 आमदार एकनाथ शिंदे यांना भेटुन गेल्याचा दावा दावोसमधून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. काँग्रेसपक्ष आज राज्याच्या राजकारणात कुठे तरी बाजुला पडत असल्याचे दिसत आहे.
विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेसपक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली, त्यात नाना पटोले यांच्यावर झालेले आरोप तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची फेरनिवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांच्या अभिनंदन पर प्रस्तावावर बोलताना नाना पटोले यांनी आधी वाट मोकळी कऊन दिल्याने नार्वेकर हे पुन्हा विधानसभा अध्यक्ष झाले. त्यामुळे नाना यांचे खास अभिनंदन यामुळे पटोले यांच्याबाबत नेहमीच किंतु परंतु कायम राहिले आहे. 16 आमदारांचा विचार केला तर त्यात मुंबईतील तीन पारंपारीक जागा, तर विजय वडेट्टीवार, नाना पटोले, विश्वजित कदम, अमित देशमुख, डॉ. नितीन राऊत, अमित झनक या प्रस्थापित आमदारांचा विचार करता, काँग्रेसच्या नवीन नेतृत्वाला टिकवण्याचे मोठे आव्हान काँग्रेसमोर असणार आहे. त्यातच आता महाविकास आघाडीतील शिवसेना आणि समाजवादी पक्ष या दोन पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने आता काँग्रेसमोर आपला पारंपारिक मतदार पुन्हा स्वत:कडे वळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इव्हिएमबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले, मारकरवाडी (ता.माळशिरस, जि.सोलापूर ) येथील आंदोलन समोर आले. या आंदोलनाला जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मोठी हवा मिळाली. मात्र त्यानंतर बीडच्या प्रकरणानंतर इव्हिएमचा विषय मागे पडला. आता पुन्हा एकदा काँग्रेसने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत राज्यभर आंदोलन केले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 48 लाख मतदार अधिक वाढले आहेत. विशेष म्हणजे 2019 लोकसभा निवडणूक ते 2024 ची लोकसभा निवडणूक या पाच वर्षात 32 लाख मतदार वाढले तर मग अवघ्या सहा महिन्यात 48 लाख मतदार कसे वाढले तसेच मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबरला झालेले मतदान आणि 21 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता 66.05 टक्के मतदान झाल्याचे अधिकृत जाहिर करण्यात आले. यात 76 लाख मतदान कसे वाढले, कोणत्या मतदार संघात संध्याकाळी पाच नंतर मोठ्या रांगा होत्या. त्याचे व्हिडीओ चित्रिकरण सादर करा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. मात्र आयोगाकडून ठोस उत्तर न मिळाल्याने आता निवडणूक याचिकेतून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर 132 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 20 ते 25 हजार नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. लोकसभेला यातील 62 विधानसभा मतदारसंघात महायुती आघाडीवर होती पण विधानसभेला याच 132 मतदारसंघातून 112 जागी महायुतीचा विजय झाला. याबाबतही काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर इव्हीएम निकालाविरोधात झालेले आंदोलन हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम होता, मात्र आता शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर पुन्हा भाजप विरोधात आक्रमक झाली आहे. तर शरद पवार यांनी देखील मधल्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्पित कार्यकर्त्यांचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केलेल्या कौतुकामुळे आता निवडणूक आयोगाविरोधातील काँग्रेसच्या लढ्याला बळ मिळणार का? हा मोठा प्रश्न आहे.
प्रवीण काळे