काँग्रेसचे ध्येय शेअरबाजार कोसळवण्याचे अर्थव्यवस्थेविरोधातील हे कारस्थान
हिंडेनबर्ग’प्रश्नी भाजप नेते रविशंकर प्रसाद यांचा आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘हिंडेगबर्ग’ या विदेशी संस्थेच्या आडून काँग्रेस देशात विकासविरोधी राजकारण करीत आहे. संपूर्ण शेअरबाजार कोसळवून देशाच्या अर्थव्यवस्थेची हानी करण्याचे या पक्षाचे ध्येय आहे., असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
हिंडेनबर्ग या अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनीने शनिवारी रात्री उशीरा भारतातील अदानी उद्योगसमूहावर आणखी एक आरोप केला होता. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी-बूच यांची अदानी समूहाच्या संशयास्पद विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे, असा तो आरोप होता. या आरोपाला माधवी पुरी-बूच, त्यांचे पती आणि सेबी या संस्थेने प्रत्युत्तर देऊन त्यांचे आरोप फेटाळले होते.
अर्थव्यवस्थेच्या हानीचे धोरण
काँग्रेस पक्षाचे नेते विदेशातून येणाऱ्या माहितीवर अवलंबून राहून अर्थव्यवस्थेची हानी करण्याचे धोरण अवलंबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेस पक्ष अत्याधिक द्वेष करतो. हा द्वेष आता इतक्या टोकाला पोहचला आहे, की त्याने भारतद्वेषाचे स्वरुप धारण केले आहे. देशाची आर्थिक हानी झाली तरी चालेल पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष करण्याची हौस भागली पाहिजे असा काँग्रेसचा खाक्या आहे. कोणत्याही पुराव्यांशिवाय हा पक्ष आरोप करीत आहे. या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या मोबाईलमध्ये केंद्र सरकारने हेरगिरीचे सॉफ्टवेअर घुसविले आहे, असा आरोप केला होता. तथापि, चौकशीच्या वेळी आपला मोबाईल सर्वोच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या चौकशी समितीला तपासणीसाठी देणे टाळले होते. यावरुन या पक्षाची राजनितीची कल्पना येते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
समर्पक प्रत्युत्तर द्या
हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन आणि सेबी यांनी समर्पक आणि प्रत्येक आरोपाच्या आधारावर उत्तर द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून करावी, अशीही या पक्षाची मागणी आहे. सेबी अध्यक्षा माधवी पुरी-बूच यांनी विनोद अदानींच्या विदेशातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, याची माहिती सेबीच्या अध्यक्षा होण्यापूर्वी उघड केली होती काय, याचे उत्तर द्या असा काँग्रेसचा आग्रह आहे. बूच यांनी हिंडेनबर्गचे सर्व आरोप नाकारले आहेत.
हिंडेनबर्गमध्ये सोरोसची गुंतवणूक ?
हिंडेनबर्ग या संस्थेत अमेरिकेतील वादग्रस्त उद्योगपती जॉर्ज सोरोस याची गुंतवणूक आहे. या उद्योगपतीशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संबंध आहे. त्यामुळे हिंडेनबर्ग काँग्रेसची राजकीय सोय करण्यासाठी भारताच्या कंपन्यांवर विविध खोटे आरोप नेहमी करत असते. या खोट्या आरोपांचा आधार घेऊन काँग्रेस नेते भारतात सरकारविरोधात रान उठविण्याचा प्रयत्न करतात. तथापि, आता हे सर्व कारस्थान लोकांच्या लक्षात आले आहे, असे प्रतिपादन प्रसाद यांनी केले.
शेअरबाजारावर परिणाम नगण्य
गेल्यावेळी हिंडेनबर्गने अदानी उद्योगसमूहावर आरोप केल्यानंतर शेअरबाजारात मोठी घसरण झाली होती. अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग कोसळले होते. मात्र, नंतर हिंडेनबर्गचे सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे आता नव्या आरोपांच्या नंतर शेअरबाजारावर त्याचा विशेष परिणाम जाणवलेला नाही. हिंडेनबर्गच्या आरोपांचा परिणाम म्हणून शेअरबाजार 200 अंकांनी घसरला. तसेच अदानी गटाचे समभागही सरासरी 7 टक्क्यांनी घसरले. तथापि, शेअरबाजार कोसळला नाही. त्यामुळे हिंडेनबर्गचा बार फुसका ठरण्याची शक्यता आहे.