For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसच्या ‘डोनेट फॉर देश’ अभियानाला प्रारंभ

06:29 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसच्या ‘डोनेट फॉर देश’ अभियानाला प्रारंभ
Advertisement

पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते शुभारंभ : काँग्रेसकडून मिशन 2024 ची तयारी सुरू

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ऑनलाइन देणगी एकत्र करण्यासाठी ‘डोनेट फॉर देश’ नावाने अभियान सुरू केले आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमात या अभियानाची सुरुवात केली आहे. डोनेट फॉर देश अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस सर्वसामान्य जनतेकडून मदत मिळवून देशाला पुढे नेण्यासाठी काम करणार असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.

Advertisement

काँग्रेसला नेहमीच सर्वसामान्य जनतेकडून मदत मिळत राहिली आहे. महात्मा गांधींनी देखील देशवासीयांकडून मदत घेत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. हे अभियान पूर्ण देशात एक चळवळ ठरत असून यात लोक पुढाकार घेत देशासाठी देणगी देत आहेत. केवळ श्रीमंतांवर विश्वास ठेवून काम करत राहिल्यास आम्हाला केवळ त्यांचे कार्यक्रम आणि धोरणे मान्य करावी लागतील. गरीबांसोबत असणारा काँग्रेस हा देशातील एकमात्र पक्ष असल्याचा दावा खर्गे यांनी यावेळी केला आहे.

देशातील मुख्य विरोधी पक्ष 28 डिसेंबर रोजी स्वत:च्या 138 व्या स्थापनादिनाच्या पूर्वी या अभियानाच्या माध्यमातून लोकांकडून 138 रुपये, 1380 रुपये, 13800 रुपये किंवा याहून 10 पट अधिक रक्कम देणगीदाखल देण्याचे आवाहन करत आहे.  काँग्रेस पक्ष निधीच्या टंचाईला तोंड देत आहे. दुसरीकडे भाजपच्या निवडणूक यंत्रणेविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला आर्थिक सहाय्याची गरज भासत आहे. भाजप बहुतांश इलेक्टोरल बाँड प्राप्त करत आहे, कारण ही योजना सत्तारूढ पक्षाला लाभ व्हावा अशाप्रकारेच तयार करण्यात आली असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. डोनेट फॉर देश अभियान मुख्यत्वे पक्षाच्या स्थापनादिनापर्यंत

ऑनलाइन राहणार आहे, त्यानंतर हे अभियान तळागाळात राबविले जाणार आहे. याच्या अंतर्गत पक्षाशी संबंधित स्वयंसेवक घरोघरी जात प्रत्येक बूथमध्ये किमान 10 घरांमध्ये जात देणगी जमविणार आहेत. काँग्रेस स्वत:ची वेबसाइट आणि एका अॅपच्या माध्यमातून हे अभियान राबवत असल्याची माहिती पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी दिली होती.

Advertisement
Tags :

.