For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसपची साथ मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; अनेक छोट्या पक्षांसोबत चर्चा

06:19 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसपची साथ मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न  अनेक छोट्या पक्षांसोबत चर्चा
Advertisement

वृत्तसंस्था/ प्रयागराज

Advertisement

बसपसाठी इंडिया आघाडीचे दरवाजे खुले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकजूट लढाईत सामील व्हायचे की नाही याचा निर्णय मायावती यांना घ्यायचा असल्याचे काँग्रेसचे उत्तरप्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी रविवारी म्हटले आहे. बसप आमच्या आघाडीत सामील व्हावा अशी आमची इच्छा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

काँग्रेस पूर्ण शक्तिनिशी समाजवादी पक्षाला समर्थन देणार आहे. उत्तरप्रदेशातील जागावाटपाचे सूत्र लवकरच ठरणार  आहे. काँग्रेस-सप आघाडी उत्तरप्रदेशाती छोट्या पक्षांसोबत चर्चा करत आहे. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व काही निश्चित केले जाणार आहे. काही पक्ष विनाअट आमच्यासोबत येणार आहेत. तर काही पक्षांनी मागण्या समोर ठेवल्याने जागावाटप निश्चित करण्यास वेळ लागत असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे.

Advertisement

समाजवादी पक्षासोबत जागावाटपासंबंधी चर्चा होत आहे. भाजपला लढत देऊ शकणारा सर्वात चांगला उमेदवार कोण याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील रालोदने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. चालू महिन्याच्या अखेरीस राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम उत्तरप्रदेशातून जाणार असून यामुळे विरोधी पक्ष एकजूट होतील असा विश्वास असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी या काँग्रेसच्या आधारस्तंभ आहेत.  त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. गांधी परिवाराच्या सदस्याने अमेठी आणि रायबरेली येथून निवडणूक लढवावी अशी काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांची इच्छा आहे. रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय प्रियांका वड्रा आणि राहुल गांधी यांना घ्यावा लागणार आहे. परंतु उत्तरप्रदेशच्या लोकांच्या भावना, आत्मियता आणि अपेक्षांचा विचार करावा लागेल. दोन्ही मतदारसंघांमध्ये गांधी परिवाराने निवडणूक लढवावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. ते योग्य निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास असल्याचे काँग्रेस नेते पांडे यांनी म्हटले आहे.

Advertisement

.