काँग्रेसचे ‘आप’विरोधात आंदोलन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीतील तीव्र पाणीटंचाईला येथील आम आदमी पक्षाचे सरकारच जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसने केला असून या सरकारविरोधात ‘मडकेफोड’ आंदोलन सुरु केले आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीतील मतभेद पुन्हा उघड झाले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या डोक्यावर मातीची मडकी घेऊन आम आदमी पक्षाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला होता. त्यांनी दिल्ली सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या आणि डोक्यावरची मडकी जमिनीवर आपटून फोडली.
काँग्रेसच्या दिल्ली शाखेचे प्रमुख देवेंदर यादव यांनीही या आंदोलनात भाग घेतला. दिल्ली सरकारने पाणी प्रश्नाचा उहापोह करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करावे. दिल्ली सरकारने वेळीच योग्य ती उपाययोजना न केल्याने ही गंभीर परिस्थिती ओढविली आहे, असा आरोप त्यांनी केला.
हिमाचलप्रदेशचा नकार
हिमाचल प्रदेशने दिल्लीला आपल्याकडील अधिकच्या पाणीसाठ्यातून पाणी पुरवावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. हिमाचल प्रदेशात आम आदमी पक्षाचा मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसचेच राज्य आहे. तरीही पाणी पुरविण्यास या सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.