Satara : कोणी सोडून गेले म्हणून काँग्रेसला फरक पडणार नाही
निवडणुकीत ताकदीने लढणार – डॉ. संतोष कदम
सणबूर : कोणीही पक्ष सोडून गेले तरी पाटण तालुक्यात काँग्रेस पक्षाला फरक पडणार नाही. तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता काँग्रेस पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढवणार असल्याचे काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी सांगितले.
डॉ. संतोष कदम म्हणाले, पाटण तालुका पूर्वीपासून काँग्रेस पक्षाच्या विचाराचा होता. मात्र मध्यंतरीच्या काळात अनेकजण काँग्रेस सोडून गेले तरी सुद्धा तालुक्यातील काँग्रेस पक्ष सक्षम आहे. कोणी पक्ष सोडून गेले म्हणून पक्षाला फरक पडणार नाही. राजकारणात चढउतार येत असतात. त्यामुळे काँग्रेस पक्ष खचून जाणार नाही.
आगामी निवडणुकीत सर्व जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात पक्षाचे उमेदवार देऊन ताकदीने लढणार आहे. सध्या पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्याशी निवडणुकीबाबतीत चर्चा सुरू आहे. सर्व गटामध्ये पक्षाचे उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे कोणीही काँग्रेस पक्षाला कमी लेखू नये, असेही डॉ. कदम म्हणाले.