For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस संपुष्टात येणार

12:18 PM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस संपुष्टात येणार
Advertisement

मगोप नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा दावा

Advertisement

पणजी : एक काळ असा होता जेव्हा काँग्रेसकडून मगोच्या आमदारांना फोडण्यात येत होते. आज नियतीने त्यांची चाल त्यांच्यावरच उलटविली असून काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हे चित्र पाहता विद्यमान लोकसभा निवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेस पक्ष संपुष्टात येईल, असा दावा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला आहे. काल रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वर्ष 2022 मध्ये काँग्रेसच्या अकरापैकी आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता लोकसभा निवडणुकीनंतर उरले सुरले तीन आमदारही इतर पक्षात सामील होतील.  ते मगोमध्ये प्रवेश करतील, असे आपण म्हणत नाही, परंतु ते काँग्रेस सोडतील हे निश्चित आहे. त्यानंतर राज्यातून काँग्रेस संपुष्टात येईल. मडकई मतदारसंघात यापूर्वीच हा पक्ष नेस्तनाबूत झाला आहे, असे ढवळीकर म्हणाले.

मगोशी प्रतारणा खलपांना महागात पडली

Advertisement

असाच प्रकार रमाकांत खलप यांच्याबद्दल घडला असून ज्या पक्षाने खलप यांना  मोठे केले त्या पक्षाला ते विसरले, त्या पक्षातील माणसांना ते विसरले. परिणामी त्यांचीही आता ’ना घर का, ना घाट का’, अशी स्थिती झाली आहे. खलप हे आजपर्यंत कधीच काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झालेले नाहीत, अशी टीका ढवळीकर यांनी केली.

... तर म्हापसा अर्बन का बुडाली?

अॅड खलप हे उच्चशिक्षित आहेत तर म्हापसा अर्बन का बुडाली? असा सवाल ढवळीकर यांनी उपस्थित केला आहे. ही बँक बुडाली त्या दरम्यान आपण सहकारमंत्री होतो. तेव्हा त्यांचे काही दस्तऐवज आपण तपासले होते. त्यावेळी अत्यंत घाणेरडा व्यवहार झाल्याचे दिसून आले होते, असा दावा त्यांनी केला.

भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होतील

लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना ढवळीकर यांनी आपला मगो पक्ष भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. मगोकडे राज्यातील 24 मतदारसंघात प्रत्येकी किमान 2500 ते 3000 मते आहेत. ही सर्व मते भाजप उमेदवारांना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कमी मतांनी पराभूत झालेले मगोचे उमेदवारही भाजपसाठी कठोर परिश्रम घेतील. दोन्ही ठिकाणी भाजपचेच उमेदवार विजयी होतील, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.