For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोंड्यातील काँग्रेसच्या विजयाने राज्यात परिवर्तन सुरू होणार

02:35 PM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
फोंड्यातील काँग्रेसच्या विजयाने राज्यात परिवर्तन सुरू होणार
Advertisement

महिला काँग्रेसच्या अरोरा यांचा दावा, भाजप विरोधात प्रचंड संताप

Advertisement

फोंडा : गोव्यात महिलांवर होणारे वाढते अत्याचार, बेरोजगारी, ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि अनियंत्रित महागाई यामुळे जनतेमध्ये भाजपविरोधात प्रचंड संताप आहे. फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून हा रोष व्यक्त होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्या विजयातून राज्यात परिवर्तनाची सुरुवात होणार आहे, असा दावा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस शिल्पी अरोरा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. काँग्रेसने डॉ. भाटीकर यांच्यासारख्या तळागाळात काम करणाऱ्या तडफदार युवा नेत्याला उमेदवारी दिली आहे. फोंड्यातील मतदारांनी कुठल्याच प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता भाटीकर यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. गोव्यातील महिला आज सुरक्षित राहिली नसून कुडचडे व राज्यातील अन्य ठिकाणी सातत्याने उघडकीस येणाऱ्या घटनांमुळे हे स्पष्ट झाले आहे. संतापाची गोष्ट म्हणजे पीडित महिलांना न्याय देण्यापेक्षा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे कृत्य भाजपचे सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे गृहिणी त्रस्त असून व्यावसायिकांना आपली दुकाने गॅस सिलिंडर अभावी बंद ठेवावी लागली आहेत. जीएसटीने सामान्य व्यावसायिकांचे गेली दहा वर्षे कंबरडे मोडले. त्यामुळे या सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी असून ती मतदानातून व्यक्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतीक्षा खलप, प्रज्योती हंडेरे, विल्मा पेरेरा व शेर्ली डायस या उपस्थित होत्या. प्रतीक्षा खलप यांनी भाजप सरकार महिलांना मतांसाठी खोटी आश्वासने देत असल्याचा आरोप केला. गृहआधार योजनेचे तीन महिन्यांचे पैसे अडवून ठेवायचे व सरकार आपल्या दारीचे नाटक कऊन हे पैसे दरमहा बँक खात्यात जमा करण्याची आश्वासने द्यायची. महिलांच्या हतबलतेचा भाजप सरकार फायदा घेत आहे, अशी टीका त्यांनी केली. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्या विषयी केलेल्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. भाटीकर यांच्या प्रामाणिकतेबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या श्रीपाद नाईक यांनी भाजपमधील 33 आमदारांपैकी किती मूळ भाजपवासीय आहेत हे आधी सांगावे, असेही खलप म्हणाल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.