Kolhapur News : कोल्हापुरात काँग्रेसचा विजय जल्लोष, अजिंक्यतारा चौक गुलालाने निघाला न्हाऊन
गुलालमय झाला 'अजिंक्यतारा'
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जस स्पष्ट होत गेला, तसे शहरातील राजकीय वातावरण उत्साहाने भरून गेले. निकालाचा प्राथमिक कल समजताच विविध प्रभागांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने अजिंक्यतारा परिसरात दाखल झाले. अजिंक्यतारा समोरील चौक फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जल्लोषपूर्ण घोषणांनी दणाणून गेला. विजयाचा आनंद व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी जल्लोषात गुलालाची उधळण केली.
दुपारी साडेचारच्या सुमारास संपूर्ण निकाल जाहीर होताच राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री झाली. मतमोजणी केंद्रांतून विजयी उमेदवारही बाहेर आले. त्यांना घेऊनच कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. रमणमळा पोस्ट कार्यालयाच्या चौकात विजयी उमेदवारांच्या समर्थक फटाके आणि गुलाल घेऊन सज्जच होते. त्यांनी उमेदवारावर गुलालाची उधळण करतच सतेज पाटील यांच्या विजयाच्यी घोषणा दिल्या. आणि घोषणा देतच समर्थकांचा ताफा वाहनांसह अजिंक्यतारा कार्यालयावर दाखल झाला. तेथे चौकात फटाक्यांची आतिषबाजी केल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण केली. त्यात अजिंक्यतारा चौक न्हावून निघाला.
नेत्यांचे औक्षण करत, गुलाल उधळत आणि मिठाई भरवत विजयाचा आनंद साजरा केला. त्यानंतर आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतले. 'बंटी पाटील, बंटी पाटील' अशा घोषणांनी परिसरात एकच जल्लोष झाला. या विजयामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी हा विजय जनतेच्या विश्वासाचा कौल असल्याचे सांगितले. शहराच्या विकासासाठी, पारदर्शक कारभारासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या धोरणांना मतदारांनी दिलेली ही पोहोचपावती असल्याची भावना व्यक्त केली. प्रचारादरम्यान मांडलेले मुद्दे, केलेली विकासकामे आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळेच हा कौल मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.