काँग्रेसकडून दलितांचा वापर फक्त निवडणुकापुरताच
भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांचा आरोप : निपाणीत डॉ. आंबेडकर भेट शताब्दी सोहळा
वार्ताहर/निपाणी
दीनदलित, कष्टकरी जनतेने समृद्ध व्हावे, शिकावे, संघटित व्हावे, याबाबत मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर निपाणीत आले होते. या गोष्टीला 100 वर्षे पूर्ण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवण्यासाठी जोल्ले दाम्पत्याने आयोजित केलेला हा शताब्दी सोहळा सन्मानास पात्र आहे. काँग्रेस पक्षाने तब्बल 60 वर्षे देशावर अधिराज्य गाजवले. यामध्ये 30 वर्षे गांधी घराण्याने पदाच्या माध्यमातून नेतृत्व केले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कधीच सन्मान केला नाही. त्यांच्या विचारांचा आदरही केला नाही. भाजपने मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाला नेहमीच आदराचे स्थान दिले. दलितांच्या विकासाला गती दिली. काँग्रेसने देशात किंवा राज्यात राजकारण करताना फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच दलितांचा वापर केला, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी केला.
निपाणीत मंगळवारी म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निपाणी भेटीचा शताब्दी सोहळा आणि बेंगळूर येथून या निमित्ताने निघालेल्या भीम यात्रेचा समारोप अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र पुढे म्हणाले, निपाणीत होणारा हा शताब्दी सोहळा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले संविधान देणाऱ्या डॉ. आंबेडकरांचा सन्मान पुऱ्या हयातीत काँग्रेसने कधी केला नाही. गांधी घराण्यातील तिघांना भारतरत्न देण्याचे काम काँग्रेसने सोईस्करपणे केले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मात्र दुर्लक्षित केले. व्ही. पी. सिंग सरकार असताना अटल बिहारी वाजपेयी यांनी आग्रह धरला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. काँग्रेसला हे का जमले नाही?, देशाला समृद्ध बनवणारे संविधान देऊन देखील अंत्यसंस्कारासाठी दिल्लीत काँग्रेसने जागा दिली नाही.
लोकसभा निवडणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढवू नये. यासाठी काँग्रेसने षड्यांत्र रचले त्याचबरोबर निवडणूक लढवत असताना त्यांचा पराभव करण्यासाठी देखील काँग्रेसनेच षडयंत्र रचले. इतकेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करणाऱ्याला पद्मभूषण देण्याची किमया देखील काँग्रेसने साधली काँग्रेसकडून दलितांच्या विषयी मोठी मोठी भाषणे केली जातात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मात्र आचरणात आणले जात नाहीत. 60 वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडल्यानंतर म्हणजेच निवडणूक किती पराभूत झाल्यानंतर संविधान आठवले आहे. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलितांचा वापर केला जात आहे. राज्यातील काँग्रेस सरकार हे जनविरोधी सरकार आहे. म्हणूनच जन आक्रोश आंदोलन छेडले आहे. गेल्या वीस महिन्यात डिझेल दरात पाच तर पेट्रोल दरात तीन रुपयांची दरवाढ या सरकारने केली आहे. जनतेच्या आक्रोशाला या काँग्रेस सरकारला सामोरे जावे लागणार आहे. येणाऱ्या काळात भाजपाला स्पष्ट बहुमताने सत्ता मिळेल असा आपल्याला विश्वास आहे. असे सांगितले.
याप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, जाती जनगणनेत मुस्लिमांना प्राधान्य दिले जात आहे. दलितांच्या राखीव निधीचा दुरुपयोग केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळा उभारणीची फक्त घोषणास केली गेली. प्रत्यक्षात मात्र पुतळा उभारला गेलेला नाही. काँग्रेसने नेहमीच दलितांना टोपी घालण्याचे काम केले आहे. त्यांना केवळ मुस्लिमांची मते हवी आहेत. जनविरोधी हे सरकार सध्या फफक्त सत्तेसाठीच धडपडत आहे. हे सरकार आगामी काळात जनताच उलथवून टाकेल असे सांगितले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायण स्वामी म्हणाले, भाजपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना न्याय देण्याचे काम केले काँग्रेसने मात्र डॉ. बाबासाहेबांचा इतिहास दडपण्याचे काम केले. काँग्रेस व महात्मा गांधींनी त्यांचा कधीच गौरव केला नाही. काँग्रेसने दलितांना नेहमीच भीतीच्या छायेखारी ठेवले. सरकारी पैशाने पक्षाचा कार्यक्रम केला जय बापू, जय भीम घोषणा केवळ मताच्या राजकारणासाठी केली. सावरकरांवरील आरोप सिद्ध केल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ जर आरोप सिद्ध केले नाही. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे मल्लिकार्जुन खर्गे हे नकली दलित आहेत. काँग्रेसचे दलित प्रेम खोटे असून त्यांना मत दिल्यास सर्वनाश होईल 40 हजार कोटीची पोकळ घोषणा सरकारने केली आहे. असे सांगितले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री तथा खासदार गोविंद कार्जोळ, एन. रवीकुमार, माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, उमेश जाधव, मुनीस्वामी, मंगला अंगडी, एससी मोर्चाचे राज्याध्यक्ष सिमेंट मंजू, एससी मोर्चाचे राज्यसचिव महेंद्र आमदार दुर्योधन ऐहोळे, निखिल कत्ती, पी. राजीव, अविनाश जाधव, महेंद्र, महादेवप्पा यादवाड, श्रीमंत पाटील, बाळासाहेब वड्डर, महेश कुमठ्ठहळ्ळी, अरविंद पाटील, बसवराज मतीगौडर, चंद्र लमानी, नारायण स्वामी, विश्वनाथ पाटील, हनुमंत निराणी, हाल शुगरचे चेअरमन एम. पी. पाटील, नगराध्यक्षा सोनल कोठडीया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सभापती डॉ. जसराज गिरे, नगरसेवक जयवंत भाटले, विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई सरकार, राजू गुंदेशा, सद्दाम नगारजी, नीता बागडे, सुजाता कदम, प्रभावती सूर्यवंशी, गीता पाटील, रंजना इंगवले, जस्मिन बागबान, अरुणा मुदकुडे, आशा टवळे, कावेरी मिरजे, सुनीता गाडीवड्डर, शहर भाजपा अध्यक्ष सुरज खवरे, ग्रामीण भाजपा अध्यक्ष सिद्धू नराटे, महिला मोर्चा अध्यक्षा योगिता घोरपडे, लक्ष्मी खोत, युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत केस्ती यांच्यासह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला उपस्थित होत्या. रमेश पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.