आणीबाणी लादून काँग्रेसचा जनतेवर अनन्वित अत्याचार
खासदार अरुण सिंग यांची टीका : भाजपतर्फे काळा दिवस साजरा
पणजी : काँग्रेसने आणीबाणी लागू केल्यानंतर 50 वर्षे झाली तो दिवस भाजपतर्फे ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात आला. पणजीतील मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भाजपचे खासदार व राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. आणीबाणी लादून काँग्रेसने जनतेवर अनन्वित अत्याचार केल्याचे सिंग यांनी सांगितले. आणीबाणी लादल्यामुळे जे काही झाले त्यावर आधारित एका पुस्तिकाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक व इतर मंत्री, आमदार प्रमुख पदाधिकारी त्यावळी क्यासपीठावर उपस्थित होते. ‘संविधान खतरे मे है’ असे सांगणाऱ्या काँग्रेस पक्षानेच संविधानाची हत्या केली, अशी टीका सिंग यांनी केली. त्याचे विपरित परिणाम आजही देशाला, जनतेला भोगावे लागत आहेत. या प्रकरणी काँग्रेसने जनतेची माफी मागावी, अशी मागणी सिंग यांनी केली.
आणीबाणीची पुनरावृत्ती होऊ नये : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीचा चांगलाच समाचार घेतला. हा काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार असून संविधानाची हत्या कशी झाली, कोणी केली याची माहिती तरुण पिढीला होण्याची गरज आहे. त्याचा तपशील महाविद्यालयीन अभ्यासक्रमात करण्याचा इरादा त्यांनी वर्तवला. त्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली असून त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जागरूक राहायला हवे, असे सावंत म्हणाले. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार विनय तेंडूलकर, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर व इतर प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.