काँग्रेसची मंगळवारी आंबेडकर सन्मान यात्रा
जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी देशव्यापी आंदोलन छेडणार : आज-उद्या 150 शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचा राजकीय वाद थांबताना दिसत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस पक्ष भाजपविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसतर्फे 24 डिसेंबर रोजी देशभरात बाबासाहेब आंबेडकर सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच रविवार आणि सोमवार हे दोन दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन भाजपविरोधी आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसच्या नियोजनाची माहिती दिली. अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ 24 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ‘बाबासाहेब आंबेडकर सन्मान यात्रा’ काढली जाणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात येणार असल्याचे पवन खेडा यांनी सांगितले. तप्तूर्वी काँग्रेस पक्ष 22 आणि 23 डिसेंबर रोजी देशातील 150 शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. बाबासाहेबांवर आणि संविधानावर होणाऱ्या हल्ल्यांविरोधातही आम्ही आवाज उठवू, असे खेडा म्हणाले.
भाजपवर हल्लाबोल
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जनतेकडून मिळालेला धक्का सहन करता आला नाही. ‘400 पार’ करून संविधान बदलण्याचे स्वप्न त्यांनी उरी बाळगले होते. मात्र, सजग लोकांमुळे संविधान सुरक्षित राहिल्यामुळे त्यांची निराशा निर्माण झाली. संसदेत अमित शहा यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते चुकून आलेले नाहीत. हे वक्तव्य चुकून बाहेर पडले असते तर भाजपच्या लोकांनी माफी मागितली असती. मात्र, भाजप नेते अमित शहांच्या विधानावर खोटा युक्तिवाद करत आहेत. यावरून त्यांचा खरा हेतू दिसून येतो.’ असा हल्लाबोल पवन खेडा यांनी केला.