काँग्रेसकडून आजपासून ‘संविधान बचाव यात्रा’
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील लोकशाही व संविधान सुरक्षित राहण्यासाठी, ते वाचविण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे राज्यभरात ‘संविधान बचाव यात्रा’ मोहीम हाती घेण्यात आली असून, ‘संविधान बचाव यात्रा’ रविवार दि. 8 जूनपासून मांद्रे विधानसभा मतदारसंघातून सुरू होणार आहे. जिल्हा पंचायत सभागृह, मांद्रे या ठिकाणी संध्याकाळी चार वाजता ‘संविधान बचाव यात्रे’चे उद्घाटन होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले की, ‘संविधान बचाव यात्रा’ ही यात्रा गोव्याच्या सर्व विधानसभा मतदारसंघात करण्यात येणार आहे. जनतेशी थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे आणि भाजप सरकारचे अपयश, भ्रष्टाचार व जनविरोधी धोरणांचा पर्दाफाश करणे हा प्रमुख उद्देश आहे.
‘संविधान बचाव यात्रा’ मोहिमेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस परैरा, एल्टन डिकोस्टा, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, तसेच काँग्रेस महिला मंडळाच्या पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.