For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री विजय यांना काँग्रेसची धमकी

06:22 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री विजय यांना काँग्रेसची धमकी
Advertisement

राहुल गांधी यांना नेता न मानल्यास बाहेर पडणार

Advertisement

► वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि काँग्रेस यांच्यात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. विजय यांना देशाचे भावी नेते म्हणून पुढे आणण्याचे अभियान त्यांच्या पक्षाने गेल्या काही दिवसांपासून हाती घेतले आहे. त्यामुळे काँग्रेस नाराज आहे. विजय यांनी राहुल गांधी यांना देशाचे भावी नेते म्हणून मान्यता दिली नाही, तर तामिळनाडूच्या मंत्रिमंडळातून काँग्रेस बाहेर पडेल, असा इशारा देण्यात आला.

Advertisement

तामिळनाडूचे पर्यटनमंत्री आणि काँग्रेस नेते एस. राजेश कुमार यांनी कन्याकुमारी येथे आयोजित काँग्रेस पक्षाच्या एका जाहीर कार्यक्रमात विजय यांच्यावर टीका केली. त्यामुळे या राज्यातील सत्ताधारी युतीत दरी निर्माण झाली आहे. राहुल गांधी हेच काँग्रेसच्या दृष्टीने भारताचे भावी नेते आहेत. त्यांच्या या स्थानाला कोणी आव्हान देत असेल, तर काँग्रेस त्याचा विरोध केल्यावाचून राहणार नाही. 2029 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हेच काँग्रेसचा आणि इंडी आघाडीचा मुख्य चेहरा असतील. अन्य कोणीही नेता त्यांचे हे स्थान हिरावून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाने हे मान्य केले नाही, तर तामिळनाडू मंत्रिमंडळातले काँग्रेसचे दोन्ही मंत्री पदत्याग करतील. त्यामुळे सत्ताधारी  गठबंधन धोक्यात येईल, याची जाणीव ठेवावी, असा इशारा त्यांनी दिला आहे.

वाद का निर्माण झाला...

नुकताच एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने ‘मूड ऑफ द नेशन’ या शीर्षकाअंतर्गत एक देशव्यापी सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जर आत्ता घेण्यात आली, तर सध्या केंद्रात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचीच सत्ता देशावर पुन्हा येईल. या आघाडीला एकंदर 326 जागा मिळतील, असे भाकित या अहवालात वर्तविण्यात आले आहे. पण त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा असा की, देशाचा भावी नेता म्हणून लोकप्रियतेच्या संदर्भात विजय यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापेक्षा वरचा क्रमांक पटकविला आहे. त्यामुळे टीव्हीके पक्षाच्या समर्थकांनी देशाचे भावी नेते म्हणून मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे नाव पुढे करण्यास प्रारंभ केला आहे. त्यांच्या नावाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. टीव्हीके पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी आता विजय यांचा प्रचार करण्यास प्रारंभ केल्याने युतीत तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना आव्हान दिलेले आहे.

निसटते बहुमत

तामिळनाडूत विजय यांच्या नेतृत्वातील युतीला निसटते बहुमत आहे. साधारणत: चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या पक्षाला 108 जागा मिळाल्या. बहुमतासाठी आवश्यक जागा 118 इतक्या आहेत. निवडणुकीची मतगणना झाल्यानंतर काँग्रेसने द्रमुकशी असणारी अनेक दशकांची युती मोडून टीव्हीके पक्षाशी युती केली. त्यामुळे हे सरकार सत्तेवर येऊ शकले. मात्र, आता पुन्हा सरकारमध्येच मतभेद होत असल्याने स्थिती सुखावह नाही, असे दिसून येते.

Advertisement
Tags :

.