Rajesh Kshirsagar Video Issue "आई अंबाबाईचं गावय, जो करेल तो भोगेल" सतेज पाटलांवरच्या टीकेला काँग्रेस नगरसेवकाचे जळजळीत उत्तर
टक्केवारीची चर्चा करताना कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगितले. व्हायरल झालेला व्हिडिओ डब असल्याचं तसेच एआय जनरेटेड असल्याचं सांगत क्षीरसागर यांनी याप्रकरणी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना जबाबदार धरले.
काही गोष्टींबाबत जबाबदार राहावे लागते असे म्हणत क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांचेही काही व्हिडिओ माझ्याकडे आहेत असं म्हणत थेट आरोप केले. काल सतेज पाटील यांनी व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना त्यावर थेट खुलासा देणं गरजेचे आहे असं आवाहन आमदार क्षीरसागरांना केले होते.
दरम्यान आमदार क्षीरसागरांनी सतेज पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक राजेश लाटकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी लाटकर यांनी राजेश क्षीरसागर यांच्या आरोपांवर जळजळीत टीका केल्याचे पाहायला मिळाले.
तुम्ही मग्रुरी करणार
तुम्ही मग्रुरी करणार, कसेही वागणार, लोकांना मारहाण करणार आणि बंटी साहेबांच्यावर टीका करणार हे खपवून घेतलं जाणार नाही असं पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काँग्रेसचे नगरसेवक राजेश लाटकर यांनी म्हटले. याप्रकरणात न्यायीक चौकशी करुन महायुतीच्या नेत्यांनी आपण पारदर्शक असल्याचं सिद्ध करावं असंही लाटकर यांनी म्हटले.
हे आई अंबाबाईचं गाव आहे जो करेल तो भोगेल त्यामुळे इधर उधर की बात मत करो, आमच्या नेत्यांवर आरोप नको हा आमचा इशारा आहे असं म्हणत लाटकर यांनी क्षीरसागरांना प्रत्युत्तर दिलं.
सतेज पाटलांवर टीका शोभत नाही
या पत्रकार परिषदेत व्हायरल व्हिडिओवर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्वीकृत नगरसेवक सुनिल मोदी यांनी म्हटले, "हा व्हिडिओ रविकिरण इंगवले आणि मी माध्यमांसमोर आणला आणि त्याची जबाबदारीही घेतली असं असताना थेट सतेज पाटलांवर टीका करणं हे राजेश क्षीरसागर यांना शोभत नाही. या व्हिडिओसंदर्भात आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला महाविकास आघाडीकडून निवेदन देणार आहोत, जर हा व्हिडिओ खोटा असेल तर आमची चौकशी करावी असं आम्ही निवेदनात म्हणणार आहोत.या विषयावर उद्या विधीमंडळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्थगन प्रस्ताव मांडला जाणार आहे".
रविकिरण इंगवले यांना ब्लॅकमेलर असं म्हणण्यापेक्षा आपण व्हिडिओच्या सत्यतेबद्दल बोलावं असं सुनिल मोदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. यावेळी हा व्हिडिओ एआयचा कसा असा प्रश्न करत राजेश लाटकर यांनी माध्यमांसमोर व्हिडिओ दाखवला.