विधानसभा निवडणुकीत 27 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य : युरी आलेमाव
पणजी : 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 27 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य असून, विरोधकांना एकत्र घेऊन पुढील राजकीय वाटचाल करण्यात येईल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट महत्त्वाची असल्याचे सांगत आलेमाव म्हणाले की, एकजुटीने विरोधकांची आघाडी पुढे नेण्यात येईल. सत्तेत आल्यानंतर काँग्रेस सरकारचे पहिले पाऊल म्हणून कलम 39A रद्द करण्यात येईल, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, कळंगुट-कळापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंचायती संचालनालयाच्या भूमिकेवरही आलेमाव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणात काम थांबविण्याचा आदेश देण्यात आला असला, तरी पंचायती संचालनालयावर आपला विश्वास नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
2027ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली असून, विरोधकांची एकजूट आणि सरकारविरोधातील मुद्दे यावर पक्षाचा भर राहणार असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.