तामिळनाडूमध्ये ‘टीव्हीके’ला काँग्रेसचा पाठिंबा
द्रमुक-अण्णाद्रमुक यांच्याकडून वेगळ्या हालचाली : सत्तास्थापनेचे चित्र अद्यापही अस्पष्ट
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूमध्ये काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यानंतर टीव्हीके प्रमुख आणि अभिनेते विजय थलपती यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. ते बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास लोक भवनात पोहोचले आणि त्यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा मिळवत झंझावात निर्माण केला आहे. टीव्हीकेला काँग्रेसच्या पाच आमदारांव्यतिरिक्त छोट्या पक्षांकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या प्रचंड विजयानंतर काँग्रेसने अभिनेता विजयला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसने डीएमकेसोबत युती करून निवडणूक लढवली असली तरी त्यांनी अभिनेता विजय यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के. सेल्वपेरुथगा आणि इतर काँग्रेस नेत्यांनी चेन्नईतील टीव्हीकेच्या मुख्यालयात टीव्हीके प्रमुख विजय यांची भेट घेतली. तामिळनाडू काँग्रेस समिती आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीकेला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेते विजय थलपती 7 मे रोजी नेहरू स्टेडियममध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू असतानाच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून टीव्हीके प्रमुख विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये तयारी सुरू आहे. राहुल गांधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. टीव्हीकेने अभिनेते विजय यांना भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
‘टीव्हीके’विरोधात राजकीय हालचाली
टीव्हीकेला काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे डीएमके अत्यंत नाराज आहे. काँग्रेसने आपला विश्वासघात केला असून 2029 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे डीएमकेने म्हटले आहे. दरम्यान, काही एआयएडीएमके आमदारांनी पक्षाचे सरचिटणीस एडप्पाडी पलानीस्वामी यांना टीव्हीकेला बाहेरून पाठिंबा देण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यात नवे समीकरण बनण्याचे संकेत मिळत आहेत. डाव्या पक्षांनी त्यांच्या पाठिंब्याबाबत 8 मे पर्यंतची मुदत मागितली आहे. आययूएमएलच्या दोन आमदारांनी डीएमके आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके हा नवीन पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. टीव्हीकेने तामिळनाडूमध्ये 108 जागा जिंकल्या. 59 जागा मिळवून डीएमके दुसऱ्या क्रमांकावर आली. एआयएडीएमकेने 47 जागा, तर काँग्रेसने पाच जागा मिळवल्या. पीएमकेने चार जागा मिळवल्या आहेत. 234-सदस्यीय विधानसभेत टीव्हीकेकडे 108 जागा आहेत, परंतु विजयने दोन जागा जिंकल्यामुळे एक जागा गमावल्यास हा आकडा 107 होईल. 233 जागांसहही बहुमत 118 इतके असल्यामुळे टीव्हीकेला आणखी 11 आमदारांची गरज आहे. सध्या त्यांना काँग्रेसच्या पाच आमदारांचा पाठिंबा आहे. भविष्यात इतर कोणते पक्ष त्यांना पाठिंबा देतील हे अस्पष्ट आहे. बुधवारी टीव्हीकेने आपल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना महाबलीपुरममधील चेंगलपट्टू येथील फोर पॉइंट्स रिसॉर्टमध्ये स्थलांतरित केल्याचे समजते.
................