For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला धक्का

06:05 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला धक्का
Advertisement

भाजप-निजद दोन ठिकाणी विजय : दोन ठिकाणी आघाडीवर

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

विधान परिषदेच्या 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघ असे एकूण 4 जागांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भाजप-निजद युतीच्या उमेदवारांनी शिक्षक मतदारसंघातील दोन जागांवर विजय मिळविला असून पदवीधर मतदारसंघातील दोन जागांवर आघाडी घेतली. या जागांवरही त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत पदवीधर मदारसंघांतील मतमोजणी सुरू होती. या अनपेक्षित निकालाने राज्यातील सत्ताधारी पक्षाला धक्का बसला आहे.

Advertisement

बेंगळूर शिक्षक मतदारसंघात निजदचे उमेदवार ए. पी. रंगनाथ यांनी काँग्रेसचे उमेदवार पुट्टण्णा यांना 908 मतफरकाने पराभवाची धूळ चारली. त्यामुळे मागील पाच निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या पुट्टण्णा यांना यावेळी धक्का बसला. रंगनाथ यांना 10,810 तर पुट्टण्णा यांना 9,902 मते पडली. एकूण मतदानापैकी 1,857 मते अवैध ठरली. सुरुवातीला मतमोजणीत पुट्टण्णा आघाडीवर होते. मात्र, अंतिम फेरीत ते पिछाडीवर पडले. ए. पी. रंगनाथ हे पहिल्या फेरीत केवळ 150 मतांनी मागे होते. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीतील मतमोजणीत त्यांनी आघाडी कायम राखली.

मागील चार वेळा शिक्षक मतदारसंघातील सलग विजय मिळविलेल्या पुट्टण्णा यांना प्रथमच पराभूत व्हावे लागले आहे. भाजपला रामराम ठोकून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर  राजाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढविली. येथे त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

शशील नमोशी पाचव्यांदा विजयी

ईशान्य शिक्षक मतदारसंघात भाजपचे शशील नमोशी हे पाचव्यांदा विधान परिषदेवर निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या शरणप्पा मट्टूर यांना पराभवाचा धक्का दिला. शशील नमोशी यांना पहिल्या फेरीत 7239, दुसऱ्या फेरीत 7311 अशी एकूण 14,540 मते मिळाली.

पश्चिम पदवीधर, आग्नेय पदवीधरमध्ये युतीचे उमेदवार आघाडीवर

पश्चिम पदवीधर आणि आग्नेय पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुकीत भाजप-निजद युतीचे उमेदवारांना अखेरपर्यंत आघाडी राखली आहे. पश्चिम पदवीधर मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एकूण 14,001 मतांपैकी भाजपचे उमेदवार एस. व्ही. संकनूर यांना 6,459 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमदेवार मोहन लिंबिकाई यांना 4,394 मते मिळाली. पहिल्या फेरीत संकनूर यांनी 2,206 मतांची आघाडी घेतली.

दरम्यान, आग्नेय पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार के. एम. सुरेश 6,296 मतांसह आघाडीवर होते. तर काँग्रेसचे उमेदवार शशी हुलिकुंटेमठ हे 5,174 मतांसह पिछाडीवर होते. पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरुच होती.

पश्चिम पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी धारवाडच्या कृषी विद्यापीठामध्ये तर ईशान्य शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कलबुर्गी येथे झाली. तसेच बेंगळूर शिक्षक मतदारसंघ व आग्नेय पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी बेंगळुरात पार पडली.

Advertisement
Tags :

.