काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ भाजपमध्ये
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काही महिन्यांपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चात्म कार्यक्रमांमध्ये काँग्रेसची बाजू ठामपणे मांडणारे या पक्षाचे लोकप्रिय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे. तो नेमका कोठे चालला आहे आणि त्याला कोण घेऊन जात आहे, हे कळावयास मार्ग नाही. ज्या पक्षात सनातनधर्मविरोधी घोषणा नित्यनेमाने द्याव्या लागतात आणि ईश्वराच्या नावाने खडे फोडावे लागतात, अशा पक्षामध्ये राहू शकत नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. गुरुवारी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याआधी त्यांनी काँग्रेसमधील आपल्या सर्व पदांचे त्यागपत्र सादर केले. त्यांनी त्यांचे त्यागपत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे ‘एक्स’ वरुन पाठविले. काँग्रेस पक्षासंबंधीचे त्यांचे सर्व आक्षेप त्यांनी त्यांच्या त्यागपत्रात स्पष्टपणे मांडले आहेत.
गौरव वल्लभ हे गेल्या सहा महिन्यांपासून अज्ञातवासात होते. ते विविध वृत्तवाहिन्यांच्या चर्चांमध्ये भाग घेत नव्हते. तसेच त्यांनी काँग्रेससाठी पत्रकारपरिषदाही आयोजित केल्या नव्हत्या. तेव्हापासूनच त्यांचे काँग्रेसशी बिनसले असल्याची चर्चा होती. पण अधिकृत दुजोरा त्यांनी किंवा काँग्रेसने दिला नव्हता.
युवकांशी जमत नाही
नव्या संकल्पना आणि नव्या महत्वाकांक्षा असणाऱ्या युवक वर्गाशी काँग्रेसचे अलिकडच्या काळात पटेनासे झाले आहे. काँग्रेसचे राजकारण 60-70 च्या दशकातील आहे, जे आज कालबाह्या झाले आहे. मात्र, हा पक्ष मुळात स्वत:मध्ये परिवर्तन किंवा सुधारणा करावयास तयारच नाही. अशा पक्षाची प्रगती होणे अशक्य आहे, अशी टीका गौरव वल्लभ यांनी पक्ष सोडल्यानंतर केली.