For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोलापूरातील मतदारांचे स्थानिक उमेदवारासह स्थानिक मुद्द्यालाचं प्राधान्य!

02:05 PM Jun 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
सोलापूरातील मतदारांचे स्थानिक उमेदवारासह स्थानिक मुद्द्यालाचं प्राधान्य
Solapur Lok Sabha Constituency Praniti Shinde
Advertisement

महायुतीचे लोकप्रतिनिधी ठरले निष्क्रिय प्रशासकराजचाही परिणाम, मराठा, मुस्लिम, दलित मते खेचण्यात काँग्रेस यशस्वी

विजयकुमार देशपांडे सोलापूर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये पराभवास सामोरे जावे लागलेल्या काँग्रेसने यावेळी मात्र प्रचंड ताकत लावून विजय खेचून आणला. विशेषतः सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक स्थानिक मुद्यांवरच झाली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच मतदारसंघात महायुतीचे लोकप्रतिनिधी निष्क्रिय ठरल्याचे दिसून आले. तर मतदारांनीही भाजपच्या आयात उमेदवारापेक्षा स्थानिक उमेदवाराला या निवडणुकीत प्राधान्य दिल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.

Advertisement

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांनी एकाकी टक्कर देत भाजपच्या सलग १० वर्षे ताब्यात असलेला मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. भाजपचे आ. राम सातपुते यांच्या पराभवाची अनेक कारणे मांडता येतील. परंतु घटक पक्षातील नेतेमंडळींना विश्वासात न घेता केलेले नियोजन आणि विरोधकांनी उचलेल्या स्थानिक मुद्द्यांमुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाला. सोलापूर महापालिकेत गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रशासकराज आहे. याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरही प्रशासक असल्याचा तोटा भाजपला झाल्याचे आता सांगण्यात येत आहे. परंतु महापालिकेतही भाजप सत्तेवर असताना सुरू असलेला सावळा गोंधळ, स्मार्ट सिटीची निकृष्ट कामे यालाही मतदार कंटाळल्याचे दिसून आले. सोलापूर शहराला मागील अनेक वर्षांपासून आठवड्यातून एकवेळ होणारा पाणीपुरवठा कळीचा मुद्दा ठरला. महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही चार वर्षे भाजपला स्थायी समितीवर चेअरमन निवडता येऊ शकला नाही, अशा अनेक कारणांचा भाजप उमेदवाराला फटका बसला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यावर मोदी विरुद्ध राहूल गांधी असा भाजपने प्रचारचा मुद्दा हातात घेतला होता. परंतु काही दिवसांतच हा मुद्दा भाजपने सोडला आणि धार्मिक मुद्द्यांवर प्रचार सुरू केला. राज्यात सुरू असलेला मराठा आरक्षणचा मुद्दाही या निवडणुकीत भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरला. मराठा, दलित आणि मुस्लिम मतांना आकृष्ट करण्यात भाजप अयशस्वी झाला.
सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरीही आहे. निर्यातबंदीमुळे गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना कांद्याला योग्य दर मिळू शकला नाही. त्याचाही भाजप विरोधी मतदानाला हातभार लागला आहे. तर सोलापूर सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळे कारखान्याच्या सभासदांमध्येही मोठी नाराजी होती. कारखान्याच्या चेअरमनसह संचालक मंडळानेही गावोगावी जाऊन भाजप विरोधी प्रचार केला. ज्या विमानतळासाठी चिमणी पाडण्यात आली ते विमानतळ तीन महिन्यांत सुरू करू, असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. परंतु त्यानंतर आजपर्यंत विमानतळ सुरू करण्यात सत्ताधारी भाजपला यश आले नाही. त्याचाही काँग्रेसला फायदा झाल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. तरीही या सर्वच मतदारसंघात काँग्रेसने मोठे मतदान मिळवले आहे. मोहोळ आणि पंढरपूर-मंगळवेढा, दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसला मिळालेला लीड शेवटपर्यंत भाजप उमेदवाराला तोडता आला नाही.

सुशीलकुमार शिंदे यांची खेळी ठरली यशस्वी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात गत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी सुमारे एक लाख ७० हजार मते मिळवली होती. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला होता. यावेळीही बंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभा केला होता. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित उमेदवाराला शेवटच्या दिवशी माघार घ्यायला लावली. तर राहुल गांधी यांच्या सभेत माघार घेतलेले वंचितचे उमेदवार पहिल्या रांगेत बसवले गेले. तर एमआयएमने उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर काँग्रेसने त्यांनाही शहर मध्यमधून आम्ही तुम्हाला विजयी करू असे असे आश्वासन देत एमआयएमला उमेदवार देण्यापासून बाजूला ठेवले. शिवाय माकपचे माजी आ. आडम मास्तर यांनाही सोबत घेतले. त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचा विजय पक्का झाला.

ऐनवेळी आलेल्या आणि नाराजांनाही घेतले सोबत
यावेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांनी आपली कन्या आ. प्रणिती शिंदे यांचे नाव जाहीर केले. त्यानुसार निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांपासून प्रचारही सुरू केला होता. काँग्रेसवर नाराज होऊन बाहेर पडलेले माजी आ. दिलीप माने, तळ्यात मळ्यात करीत असलेले महादेव कोगनुरे यांना पक्षात घेऊन सोबत घेतले. शिवाय यापूर्वी नाराज होऊन काँग्रेस सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले महेश कोठे, यू. एन. बेरिया, सुधीर खरटमल, नलिनी चंदेले यांनाही काँग्रेसचा प्रचार करण्यास भाग पाडले. सुशीलकुमार शिंदे हे उमेदवार नसल्याने त्यांनी बाहेर राहून केलेले योग्य नियोजन काँग्रेसला विजयी होण्यास लाभदायक ठरले.

Advertisement
Tags :

.